एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गॅस कटरच्या मदतीने युनियन बँकेचे एटीएम फोडून ९ लाख ५५ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील कासोदा शहरात बिर्ला चौकात असलेले युनियन बँकेचे एटीएम आहे. ३१ मे रोजी रात्री १० ते १ जून रोजी सकाळी ४.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून एटीएम मशिन फोडून त्यातील ९ लाख ५५ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निता कायटे यांच्यासह पथकाने धाव घेवून पाहणी केली. यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी घटनास्थळी भेट घेवून चौकशी केली. दरम्यान, परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने गुन्हेगारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निता कायटे हे करीत आहे.