गॅसचा भडका : साडी पेटून महिला भाजली

gas

जळगाव प्रतिनिधी | गॅसवर स्वयंपाक करताना गॅसने अचानक भडका घेतल्याने साडीला आग लागून 35 वर्षीय महिला भाजल्या गेल्याची घटना आज घडली आहे. महिलेस उपचारार्थ जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून याबाबत तालुका पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली चंद्रकांत साळुंखे (वय-35) रा.श्रीकृष्ण कॉलनी, चंदू अण्णा नगर जवळ, पोलिस लाईन जळगाव ह्या आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे घरातील घरगुती गॅसवर स्वयंपाक करत असताना अचानकपणे गॅसने भडका घेतल्याने त्यांच्या साडीने पेट घेतला. यावेळी घरात कोणीही नव्हते. त्यांची आई मथुराबाई आधार सपकाळे आणि पती चंद्रकांत रामदास साळुंखे हे कामानिमित्त बाहेर गेले होते. वैशाली साळुंखे यांच्या साडीने पेट घेताच त्यांनी आरडाओरड केल्याने गल्लीतील स्थानिक रहिवाशांनी आग विझवून तातडीने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश जगताप यांनी तपासणी केली असता त्यात 100 टक्के भाजल्या गेल्याचे सांगितले. यापूर्वी दीडवर्ष अगोदर याच पद्धतीने वैशाली साळुंखे गॅसच्या फडक्याने 45 टक्के भाजल्या गेल्या होत्या, अशी माहिती त्यांचे पती चंद्रकांत साळुंखे यांनी सांगितले. याबाबत तालुका पोलिसात घटनेबाबत नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ मगन मराठे करीत आहे.

Protected Content