गांजा तस्कराला अटक, १९ किलो गांजा जप्त; कासोदा पोलीसांची मोठी कारवाई

एरंडोल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील वनकोठे गावाजवळ पेट्रोलींग करत असतांना कासोदा पोलीसांनी दुचाकीवरून गांजाची वाहतूक करणाऱ्या संशयित आरोपीला अटक केली आहे. त्यांच्याकडून २ लाख ८० हजार रूपये किंमतीचा १९ किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय रवींद्र पवार (वय २७, रा. सोनबर्डी, ता. एरंडोल) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत गांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने, पोलीस उपनिरीक्षक निलेश राजपूत आणि त्यांच्या पथकाने मागील पाच दिवसांपासून साध्या वेशात परिसरात पाळत ठेवली होती. सुरुवातीचे चार दिवस त्यांना यश मिळाले नाही, परंतु २५ फेब्रुवारी २०२५ रोजी पेट्रोलिंग दरम्यान वनकोठे गावाजवळ त्यांना एक संशयित व्यक्ती एरंडोलकडून कासोद्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोटारसायकलवर प्लास्टिकच्या गोणीत गांजा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून मोटारसायकलचा पाठलाग करत त्याला थांबवले. त्याची मोटारसायकल आणि त्यावरील गोणी तपासली असता, त्यात खाकी रंगाच्या पॅकिंग टेपने पॅक केलेले चौकोनी आकाराचे पुडे मिळाले. ते पुडे उघडून पाहिले असता त्यात गांजा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपीला ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला आणले.

पोलिसांनी संशयित आरोपी अजय रवींद्र पवार (वय २७, रा. सोनबर्डी, ता. एरंडोल) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १९ किलो गांजा आणि मोटारसायकल असा एकूण २ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस हवालदार नंदलाल परदेशी यांच्या फिर्यादीनुसार, गांजाची वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध अमली पदार्थ आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे (एनडीपीएस) अधिनियम १९८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनांनुसार, पोलीस उपनिरीक्षक निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक दत्तू खुळे, पोलीस हवालदार नंदलाल परदेशी, पोलीस नाईक अकील मुजावर, पोलीस नाईक किरण गाडीलोहार, पोलीस नाईक नरेंद्र गजरे, पोलीस कॉन्स्टेबल समाधान तोंडे, पोलीस कॉन्स्टेबल लहू हटकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश राजपूत करत आहेत.

Protected Content