जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अजिंठा चौक ते कालिंकामाता मंदीर दरम्यान रिक्षात बसलेल्या प्रवाशांच्या पिशवीला कट मारून २५ हजार लुटणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्यात एमआयडीसी पोलीसांनी अल्पवयीन मुलासह रिक्षाचालक आणि एकला अटक करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा जनसंपर्क कार्यालयाने मंगळवारी १ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकातून कळविले आहे.
अधिक माहिती अशी की, शनिवारी २९ मार्च २०२५ रोजी बुलढाण्यातील नांदुरा येथील शेख फिरोज शेख शादुल्ला हे जळगाव एमआयडीसीतील अजिंठा चौफुली येथे थांबले होते. त्यांच्याजवळ २५ हजार रुपये होते. त्यावेळी एक रिक्षा थांबली आणि खामगावला जायचे आहे, असे सांगून त्यांना बसवले. काही अंतरावर गेल्यावर रिक्षातील प्रवाशांनी सीटवर बसता येत नसल्याचे सांगून त्यांना खाली उतरण्यास सांगितले. शेख फिरोज खाली उतरताच रिक्षा निघून गेली. त्यांनी पैशांची पिशवी पाहिली असता ती फाटलेली होती आणि पैसे गायब होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेनंतर जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेत्रम प्रोजेक्ट सुरू केला आहे. या प्रोजेक्टमध्ये शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत आणि ते पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षाला जोडले आहेत.
या चोरीचा तपास करण्यासाठी पोलिसांनी नेत्रम प्रोजेक्टमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक संशयित रिक्षा दिसली. सोमवारी ३१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता पोलिसांनी रिक्षाचालक वसीम कय्युम खाटीकला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच, तौसीफ खान आणि एका अल्पवयीन मुलाने मिळून चोरी केल्याचे सांगितले. तौसीफ खान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून चोरीची २५ हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल राहुल रगडे, विशाल कोळी, रतन गिते आणि गणेश ठाकरे यांनी केला.