जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील वावडे गावातून सोलरची केबल चोरी प्रकरणी गुन्हा दाखल होताच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी 6 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता तांत्रिक विश्लेषण करीत धुळे जिल्ह्यातून 5 जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळीत जेरबंद केले. अटकेतील संशयित आरोपींना न्यायालयाने बुधवारी 8 जानेवारीपर्यंत दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अमळनेर तालुक्यातील वावडे गावात शेतात एमएसईबीने सोलर प्लान्ट बसविले आहे. या सोलर प्लान्टच्या ठिकाणाहून चोरट्यांनी सोलरची केबल चोरुन नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापुर्वी देखील असे गुन्हे दाखल झाल्यामुळे हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार उपनिरीक्षक गणेश वाघमारे, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील, गोरख बागुल, भगवान पाटील, राहूल कोळी, राहुल बैसाणे, दीपक चौधरी, महेश सोमवंशी यांचे पथक तयार केले होते. या पथकाकडून संशयितांचा शोध घेतला जात होता. पथकाने तपासचक्रे फिरवित संशयित गोकुळ हिरामण कोरडकर (वय २५), गोकुळ जानकू थोरात (वय २४), जिभाऊ वामन थोरात (वय २८, तिघ रा. रायपूर, ता. साक्री, जि. धुळे), गोकुळ राजेंद्र भामरे (वय २४), राकेश धनराज पाटील (वय २४, रा. कापडणे, ता. साक्री, जि. धुळे) यांच्या मुसक्या आवळल्या. तर अन्य पाच साथीदार फरार असून पथक त्यांच्या मागावर आहे.