शेतातील ईलेक्ट्रीक तारांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; साडेतीन लाखांचा ऐवज जप्त

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चारचाकी वाहनात येऊन मध्यरात्रीच्या सुमारास शेतातील इलेक्ट्रीक पोलवरुन विद्युत तारा चोरी करणाऱ्या मध्यप्रदेशातील टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. या टोळीने वर्षभरापासून ४४ गुन्ह्यांची पथकाने उकल केली. त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांचा ऐवज व कार जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रावेर, फैजपूर, यावल, मुक्ताईनगर या भागातील शेतातील इलेक्ट्रीक पोलवरुन विद्युत तारा चोरीच्या घटनांमध्ये काही महिन्यांपासून वाढ झाल्याने शेतकरी हैराण झाले होते. या गुन्ह्यांची उकल करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पथक गेल्या दीड महिन्यांपासून संशयितांचा शोध घेत होते. विद्युत तार चोरी करणारी टोळी ही मध्यप्रदेशातील नूरा मोरे व अनिल भेरसिंग मंडले यांच्या पथकाने केल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा चरुन तार चोरी करतांना नूरा केरसिंग मोरे (वय ३५, रा. झिरपांझऱ्या, ता. धुलकोट, जि. बऱ्हाणपुर) याला रंगेहाथ पकडले. यावेळी त्याचे साथीदार मात्र तेथून पसार झाले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने रावेर, फैजपूर, यावल या भागाील ४४ ठिकाणी चोरी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली असून आणखी काही गुन्हे उडघडकीस येण्याची शक्यता आहे.

टोळीतील मुख्य संशयित नूरा मोरे याच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याला खाक्या दाखविताच त्याने या चोऱ्या त्याने खरेदी केलेल्या (एमपी ६८, झेडसी २५४६) क्रमांकाच्या कारने त्याचा शालक अनिल भेरसिंग मंडले, संजू चमार वास्कले (दोघ रा. परचुड्या, म. प्र) दिना मोरे, सावन उर्फ पंडू मोरे (दोघ रा. निलीखाडी, म. प्र) यांच्या साथीने केल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्या देखील पथकाने मुसक्या आवळल्या. चोरलेली तार रावेर येथील भंगार विक्रेता यासीन हुसेन खान (वय ४२, रा. उटखेडा रोडा रावेर) याच्याकडे विक्री करीत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्याुसार भंगार विक्रेत्याला देखील अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा सखोल तपास करीत रावेर पोलीस ठाण्यातील २२, यावल पोलीस ठाण्यातील १४ तर निंभोरा आणि फैजपूर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी चार अशा एकूण ४४ गुन्ह्यांची उकल केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी, एलसीबीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, पोहेकॉ महेश महाजन, नितीन बाविस्कर, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, ईश्र्वर पाटील, बबन पाटील, प्रदीप सपकाळे, प्रमोद ठाकूर यांच्या पथकाने केली.

Protected Content