शेगाव : (अमोल सराफ) येथील श्री गजानन महाराज संस्थानचा ‘श्री’चा पालखी सोहळा पंढरपूर पायदळ वारीकरीता भजनी दिंडी, गज व अश्वासह आज सकाळी रवाना झाला आहे. यावेळी भक्तांच्या उत्साहाला उधान आले होते.
संपुर्ण महाराष्ट्रातून श्री क्षेत्र पंढरपूरला बहूतेक सर्व संताच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा आहे. भक्त आणि भाविकांना तीर्थयात्रा घडाव्यात आणि वारकरी संप्रदायाच्या महान परंपरेची जपणूक व्हावी, या उद्देशाने श्री गजानन संस्थानचे १९६८ पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारी व श्री क्षेत्र आळंदीला मोटारीने पालखी दिंडीसह नेण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. याशिवाय श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, श्री क्षेत्र पैठण, श्री क्षेत्र मुक्ताईनगर याठिकाणी देखील संस्थानची वारी निमित्त पालखी जात आहे. आषाढी वारीकरीता पंढरपुरला जाताना वारकरी दरवर्षीसोबत निघतात. दिंडीमुळे विवेक, वैराग्य, भक्ती व ज्ञान या तत्वांचा लोकांना बोध होतो व आध्यात्मिक कार्य गतीमान होवून धर्माप्रती श्रध्दा व भावना वृध्दीगंत होतात. तसेच लोकजीवनावर आध्यात्मिकतेचा प्रसाद पडण्यास मदत होते.
दारिद्रय, अज्ञान, अंधश्रध्दा, व्यसनाधिनता अशा अनेक समस्यांनी ग्रासलेली अनेक छोटी गावे पायी वारीच्या वाटेत आहेत. या गावामध्ये हरीनामाचा प्रसार करून तेथील ग्रामस्थांचे जीवन (आयुष्य) सुखकर करणे, तेथील व्यसनाधिनता, अंधश्रध्दा दूर करणे हे या वारीमागचे आणखी एक कारण संस्थानचे पायी वारीकरीता श्री महाराजांची चांदीची नवीन पालखी बनारस येथील कारागिर आणून तयार करून घेतली आहे. त्यावरील नक्षीकाम अत्यंत कलापूर्ण असून ही पालखी पाहताक्षणीच अंत:करणातील भक्तीभाव उंचबळून येतो.
श्रींच्या पालखीचा प्रवास
श्रींच्या पालखी सोहळ्याचे हे ५२ वे वर्ष आहे. शेगाव ते श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत ७५० कि.मी. आणि श्री क्षेत्र पंढरपूर ते शेगावपर्यंत परतीचा प्रवास हा ५५० किलोमीटर आहे. असा एकुण १३०० किलोमीटरचा हा प्रवास आहे.
ठिकठिकाणी स्वागत
श्रींचे पालखीचे स्वागताकरीता गावातील भजनी मंडळी, बँडपथक, तुलसी वृंदावनासह ठिकठिकाणी रांगोळ्या काढलेल्या व पुष्प वर्षाव केला जातो. श्रींचे पालखी सोबत असलेल्या वारकरी मंडळींना चहापानी व अल्पोपहाराची व्यवस्था केलेली राहते. तसेच श्रींच्या पालखीचे गावातील नागरीकाकडून मनोभावे श्री महाराजांना शाल, श्रीफळ वाहून स्वागत केल्या जाते.
प्रवासात असणाऱ्या सोयी
श्रींचे पालखी सोबत प्रवास करताना वारक-यांची दुपारी व रात्री भोजन प्रसादाची व्यवस्था केली जाते. त्याचप्रमाणे वाटेने चहापानी व फराळाची व्यवस्था सुध्दा श्रींच्या भक्तांकडून केल्या जाते. रात्रीचे मुक्कामी निवासाची व्यवस्था धर्मशाळा, मंगल कार्यालय व शाळा यामध्ये केलेली असते. स्नानाकरीता पाण्याची व्यवस्था असते. काही ठिकाणी भक्त आपआपल्या परीने वारकरी मंडळींची सेवार्थ व्यवस्था करतात. वाटेत भेटणा-या वारकरी दिंड्यांची सेवा श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारीकरीता इतर भजनी दिंड्या पायी जात असतात. वाटेने भेटणाºया दिंड्यातील पुरूष, महिला, मुले-मुली इत्यादी वारकºयांना संस्थानकडून कपडे वितरीत करण्यात येतात. तसेच प्रत्येक पंढरीच्या मार्गावर भेटणाºया दिंडीतील वारकरी मंडळींना आवश्यकतेनुसार औषध, इंजेक्शन, सलाईन देवून सेवार्थ औषधोपचार करण्यात येतो. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याकरीता टँकरची व्यवस्था केलेली असते.
असा राहिल पालखीचा मार्ग
पालखी ८ जून रोजी श्री क्षेत्र नागझरी, गायगाव, भौरद, अकोला, भरतपूर, वाडेगाव, देऊळगाव, पातुर, मेडशी, श्री क्षेत्र डव्हा, मालेगाव, शिरपूर जैन, चिंचाबा पेन, म्हसला पेन, किनखेडा, रिसोड, पानकन्हेरगाव मार्गे १० जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचेल.
परतीचा मार्ग
पालखी पंढरपूर येथे १० ते १५ जुलै पर्यंत मुक्काम राहून कुडवाळी, भगवान बार्शी, पाली, बिड, गेवराई, शहापूर, लालवाडी, जालना, सिंदखेडराजा, जालना, लोणार, मेहकर, जानेफळ, शिर्ला नेमाने, आवार व खामगाव येथे ५ आॅगस्ट रोजी मुक्काम व ६ अॉगस्ट रोजी शेगावकडे प्रस्थान करून ‘श्रीं’चा पालखी सोहळा शेगावात दाखल होईल.