जळगाव प्रतिनिधी । राज्यातील जवळपास 25 गडकिल्ले लग्नसोहळ्यासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतल्याने राज्य सरकारवर चौफेर टीका झाली. या पार्श्वभूमीवर आज मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, राज्यातील गडकिल्ले महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून भाड्याने देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. किल्ल्यांवर हेरिटेज हॉटेल उभारणी करण्यात येणार असून करारावर हॉटेल व्यावसायिकांना किल्ले देण्यात येणार आहे. अशा 25 किल्ल्यांची यादी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून काढण्यात आली आहे. लाखो मावळ्यांच्या रक्ताने उभे झालेले शिवरायांचे गडकिल्ले भाडेतत्त्वावर देणे म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता गहाण ठेवण्यासारखे आहे. यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज शहरातील शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जाहिर निषेध व्यक्त केला. मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, दिपक पाटील यांच्यासह आदी मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.