नागपूर वृत्तसंस्था । शिवसेना केवळ आपला रंग भगवा असल्याचे भासवते आहे. मात्र, प्रत्यक्षात ती आता काँग्रेसच्या रंगात रंगली आहे, असा घणाघाती आरोप भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ नागपूर जिल्ह्यातील मांढळ येथे नितीन गडकरी यांची जाहीर सभा झाली.
नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेचा समाचार घेतला. शिवसेनेने केवळ मुख्यमंत्रिपदासाठी स्वत:च्या विचारधारेशी तडजोड केली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाराष्ट्रात केवळ सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आले आहेत, असा घणाघात गडकरी यांनी केला.
शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरून भाजपाशी युती तोडून महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आले आहे. या घडामोडींनंतर गडकरी पहिल्यांदाच आज शुक्रवारी इतक्या आक्रमकपणे शिवसेनेवर बरसलेत. यावेळी त्यांनी भाजपाची साथ सोडून सत्तेत गेलेल्या शिवसेनेवर ही घणाघाती टीका केली.