जळगाव प्रतिनिधी । ग.स. सोसायटीमधील G. S. Society Jalgaon गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर आता संस्थेचे माजी अध्यक्ष विलास नेरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता असून याबाबत शिक्षणाधिकार्यांनी प्रशासकीय कारवाईचे पत्र दिले आहे.
सरकारी नोकरांची सहकारी संस्था म्हणजेच ग. स. सोसायटीतील G. S. Society Jalgaon गैरव्यवहाराप्रकरणी माजी अध्यक्ष विलास नेरकर यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार झाले आहेत. त्यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करून अहवाल सादर करावा असे आदेश शिक्षणाधिकार्यांनी भडगाव गटशिक्षणाधिकार्यांना काढले आहे.
नेरकर ग. स. सोसायटीमध्ये अध्यक्ष असतांना तत्कालीन व्यवस्थापक विजय प्रकाश पाटील यांच्या नियमित वेतनश्रेणीच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. त्यांनी बनावट आदेश काढून गैरलाभ दिल्याच्या आरोपाप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात ८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांचा पोलिसांनी तपास घेतला असता ते मिळून आले नाहीत. यानंतर आता शिक्षणाधिकार्यांनी त्यांच्यावर कारवाईसाठी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्यामुळे नेरकरांवर निलंबनाची कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहेत.