जळगाव प्रतिनिधी । अपसंपादीत 50 लाख रूपये अष्टचक्र ठेवीत ठेवून नंतर व्याजासह रक्कम काढून ग.स.सोसायटीची फसवणूक केल्याप्रकरणी ग.स.सोसायटीचे माजी अध्यक्ष सुनील सुर्यवंशी आणि त्यांचे सहकारी किरण पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली होती. याप्रकरणी अधिक चौकशी व्हावी म्हणून ला.प्र.वि.चे पोलीस उपअधिक्षक जी.एम.ठाकूर यांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. परंतू न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
पोलीस कोठडी मिळण्याची कारणे अशी आहेत
- 1. संशयीत आरोपी सुनिल सुर्यवंशी व किरण पाटील यांनी जळगांव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चोपड़ा शाखेत बनावट दस्तऐवज तयार करुन, खोटे खाते उघड्न रकमेचा अपहार केल्याने त्यांच्याविरुध्द सीबीआय पथकाने कारवाई करुन चोपडा शहर पोलीस स्टेशनला येथे भादवि क.१२०(ब), ४०९, ४६५, ४७७(अ) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम १३(२), १३(१)(क), १३(१)(ड) अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांचे विरुध्द मा. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, अमळनेर येथे स्पेशल केस क्रमांक ०२/२०१८ दि.१५.०२.२०१८ अन्वये दोषारोप पत्र दाखल करण्यात आले असुन सदरची केस न्यायप्रविष्ट आहे.
- 2. सदर संस्थेमध्ये एकुण ३८ कार्यकारी संचालक, संस्थेच्या ५२ शाखा, ४० हजार सभासद व संस्थेचे १ हजार कोटी खेळते भांडवल अशा प्रकारे संस्थेची मोठी व्याप्ती असून तपास क्लिष्ट स्वरुपाचा आहे. सदर गुन्हयातील आरोपींनी १२ फेब्रुवारी २०१६ रोजी संस्थेत जमा केलेले ५० लाख रुपये कोठून आणले. याबाबत दोन्ही आरोपींकडे विचारपूस केली असता ते उडवाउडवीचे उत्तरे देत आहे. तरी दोन्ही आरोपींना पुन्हा विश्वासात घेवून त्यांची चौकशी करणे आवश्यक आहे.
- 3. सदर गुन्हयातील दि.१९.०९.२०१६ रोजी प्रथम चेक व रोखीने व्याजासह प्राप्त केलेल्या ५१ लाख ७८ हजार ८८७/- रुपयांची आरोपींनी कोणत्या प्रकारे विल्हेवाट लावली? याबाबतची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.
- 4. आरोपींनी सदर बेहोशोबी ५० लाख रुपये संस्थेत बनावट खाते उघडुन गुंतवणुक केली असुन सदर प्रकरणात इतर कार्यकारी मंडळाचे संचालक अथवा सदर संस्थेतील अधिकारी अथवा कर्मचारी यांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबत तपास आरोपींकडून करावा लागणार आहे.
- 5. आरोपीतांनी बँक अकाउंट, पोस्ट ऑफीस, पतपेढी मधील खात्यांमध्ये व इतर योजनांमध्ये गुंतवणूक केली असण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबत चौकशी करणे आवश्यक असुन सदरची माहिती आरोपी यांचेकडुनच प्राप्त होवु शकते.
- 6. आरोपींची जळगाव शहर व जिल्हयात वेगवेगळ्या ठिकाणी स्थावर आणि जंगम मालमत्ता असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तपास करणे गरजेचे असुन सदरची माहिती ही आरोपींकडूनच प्राप्त होवु शकते.
- 7. दोन्ही आरोपींच्या हस्ताक्षराचा नमूना घ्यावा लागणार आहे.
- 8. आरोपींनी यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत किंवा कसे ? याबाबत तपास करणे आवश्यक आहे.
बघा : ला.प्र.वि.चे पोलीस उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांनी दिलेली माहिती