Home क्रीडा खेळांमध्ये तरूणांचे भविष्य – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे 

खेळांमध्ये तरूणांचे भविष्य – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांवर वाढत चाललेला तणाव कमी करण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ हे अत्यावश्यक माध्यम ठरत आहे. बुद्धिबळ सारख्या बौद्धिक खेळामुळे महाराष्ट्राचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान वाढला आहे. त्यामुळे खेळाला केवळ छंद म्हणून नव्हे, तर भविष्यासाठीच्या माध्यम म्हणून जोपासले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.

जळगाव येथील जैन हिल्सच्या भव्य अनुभूती मंडपममध्ये सुरु झालेल्या ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या स्पर्धेमध्ये देश-विदेशातून एकूण ५३८ खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये पाच वर्षांचा वल्लभ कुलकर्णी, आशियाई विजेता अद्वित अग्रवाल, पश्चिम बंगालचा १० वर्षाखालील विश्वविजेता मनिष शरबातो, तसेच ७ वर्षाखालील स्कूल गेम विजेती प्रणिता वकालक्ष्मी यांचा समावेश आहे. युएई, अबुधाबी, जर्मनी, मलेशिया येथील भारतीय वंशाचे खेळाडूही या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

उद्घाटन सत्रात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, सचिव निरंजन गोडबोले, जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन आणि आंतरराष्ट्रीय पंच देवाशीष बरूआ हे मंचावर उपस्थित होते. दीपप्रज्वलनानंतर रक्षा खडसे आणि चिमुकला वल्लभ कुलकर्णी यांनी सेरीमोनियल मूव्ह करत स्पर्धेचे उद्घाटन केले. महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

रक्षा खडसे पुढे बोलताना म्हणाल्या की, शासन स्तरावर क्रीडा धोरण तयार केले जात असून, प्रत्येक मुलापर्यंत खेळ पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. खेळामुळे नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि वेळेचे नियोजन शिकता येते. ऑलिम्पिकमधील भारताचे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी विशेष स्पोर्ट्स पॉलिसी तयार केली जात आहे, तसेच क्रीडा दिनाच्या निमित्ताने तीन दिवसीय विविध प्रोत्साहनपर उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात अतुल जैन यांनी भारतात बुद्धिबळ खेळाचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. दिव्या देशमुख व कोनेरु हम्पी यांच्या यशामुळे या खेळात नवचैतन्य निर्माण झाले असून, दिव्या देशमुखने २०२२ मध्ये जळगावमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतल्याची आठवण त्यांनी करून दिली. खासदार स्मिता वाघ यांनी देशभरातून आलेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि “काही तरी शिकून जाऊ किंवा जिंकून जाऊ, परंतु जळगावच्या आठवणी घेऊन नक्कीच जाऊ” असे भावनिक उद्गार काढले.

सिद्धार्थ मयूर यांनी स्पर्धेच्या आयोजनाबाबत माहिती देत सांगितले की, यंदा लिंगभेद न करता मुला-मुलींना समान पारितोषिक दिले जाणार असून विजयी, पराजित व बरोबरीत खेळणाऱ्यांचाही यथोचित गौरव केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय पंच देवाशीष बरुआ यांनी तांत्रिक सत्राद्वारे खेळाडूंना स्पर्धेच्या नियमावलीची माहिती दिली. राष्ट्रगीताने उद्घाटन सत्राची सांगता झाली.

या भव्य बुद्धिबळ महोत्सवामुळे जळगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित झाले असून, अशा आयोजनांमुळे शहरात क्रीडा संस्कृतीला नवे आयाम मिळत आहेत. ही स्पर्धा २ ते ८ ऑगस्टदरम्यान सुरु राहणार आहे.


Protected Content

Play sound