भुवनेश्वर (वृत्तसेवा) ओडिशातील पुरीच्या किनारपट्टीवर धडकलेल्या फनी वादळानं ओडिशात हाहाकार माजवला आहे. या वादळामुळे येथील घरं, वृक्ष जमीनदोस्त झाली असून अनेक भाग जलमय झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. या वादळामुळे आतापर्यंत ३ जणांचा बळी गेला असून अनेक लोक जखमी झाले आहेत.
आज सकाळी ८ वाजता फनी चक्रीवादळाने पुरीच्या किनारपट्टीवर धडक दिली. त्यामुळे पुरीच्या किनारपट्टीवर ताशी १७५ किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले. त्यानंतर हवेचा वेग वाढून ताशी २४५ किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले. समुद्रातही उंचच उंच लाटा उसळू लागल्या आणि अनेक घरात पाणी शिरायला सुरुवात झाली. वादळाबरोबरच मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानं ओडिशातील अनेक भाग जलमय झाले. ज्या भागात फनी वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आणि बसण्याची शक्यता आहे, अशा भागातील १२ लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. गुरुवारी ११ लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. सुमारे १० हजार गावं आणि ५२ शहरातून या लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे. यापैकी ११ लाख लोकांना ४ हजार पुनर्वसन केंद्रात हलविण्यात आलं आहे. त्यात चक्रीवादळापासून बचाव करण्यासाठीच्या ८८० मदत केंद्रांचा समावेश आहे. वादळाचा तडाखा बसलेल्या भागातील नागरिकांना भोजनाची पॉकेट विमानाने पाठवण्यात येणार आहेत. त्याशिवाय दोन हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले आहेत, असं ओडिशाचे विशेष मदत आणि पुनर्वसन आयुक्त बिष्णुपाद सेठी यांनी सांगितलं.