जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे विजेच्या धक्क्याने मृत झालेल्या वानरावर ग्रामस्थांनी विधीवर अंत्यसंस्कार केले.
जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे एक जंगली माकड अचानक अन्न पाण्याच्या शोधात गावात शिरले आणि काहीतरी खायला मिळेल म्हणून इकडून तिकडे उड्या मारण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. पण उड्या मारताना माकडाचा अचानक तोल गेल्यामुळे टावर जवळच असलेल्या इलेक्ट्रिक डीपीवरच्या तारेमध्ये माकडाचा पाय अडकला आणि माकडाला विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला.
ही घटना जवळपासच्या ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर मरण पावलेल्या माकडाचा हिंदू धार्मिक विविध पद्धतीने अंत्यविधी तसेच पुढील सर्व कार्यक्रम नियोजित करण्यात आला. त्याच पद्धतीने ग्रामस्थांनी एकत्रित येऊन माकडाची आंघोळ व पूजा विधि करून अंत्ययात्रा काढण्यात आली. तसेच माकडाची इत्यंभूत माहिती वनविभागाच्या अधिकार्यांना देऊन माकडाला एका शेतामध्ये दफन करण्यात आले असून माकडाचा सावडण्याचा कार्यक्रम व दशक्रिया म्हणजेच दिवसाचा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आलेला आहे.
अशा पद्धतीने एका हनुमंत रुपी रामदूत माकडाचा देऊळगाव गुजरी येथील ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अंतयात्रा काढून पुढील सर्व कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पाडण्याची जबाबदारी निभवलेली आहे. या कार्यक्रमांमध्ये जवळपास सर्वच ग्रामस्थ हजर होते.