विद्यापीठाच्या इन्क्युबेशन केंद्रासाठी इनोव्हेशन सोसायटीतर्फे निधी मंजूर

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इन्क्युबेशन केंद्राच्या (केसीआयआयएल) कामाची उत्तम वाटचाल पाहून महाराष्ट्र शासनाच्या इनोव्हेशन सोसायटीच्या वतीने १ कोटी ५ लाख ४० हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

खानदेशात स्टार्टअप उद्योगांना चालना मिळावी व नव उद्योजकांना प्रेरणा मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने इन्क्युबेशन अर्थात केसीआयआयएलची उभारणी करण्यात आली असून गेल्या वर्ष भरात खानदेशात २० जणांना स्टार्टअप उद्योग या केंद्रामुळे उभारता आले आहे. यातील ४ उद्योगांचे उत्पादनही सुरू झाले आहे. या शिवाय ३० पेक्षा अधिक जणांना रोजगार प्राप्त झाला आहे. कृषी, आरोग्य, इलेक्ट्रीक वाहन, अन्न प्रक्रिया आदी क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअपना ही मदत झाली आहे.

नवीन उद्योग सुरू करण्यासाठी या केंद्राकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. या कामाची दखल राज्य शासनाच्या इनोव्हेशन सोसायटीने देखील घेतली असून १ कोटी ५ लाख ४० हजार रूपयांचा निधी या केंद्रासाठी मंजूर करण्यात आला आहे. या केद्रांचे सक्षमीकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीची सक्षमीकरण समिती असून या समितीच्या बैठकीत केसीआयआयएलच्या कामाबद्दल समाधन व्यक्त करण्यात आले. या समितीने राज्यातील केंद्रांची ३ गटात विभागणी केली असून लिडर्स, इमर्जिंग आणि बिगीनर्स असे हे तीन गट असतील. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या या इन्क्युबेशन केंद्राचा समावेश इमर्जिंग मध्ये करण्यात आला आहे. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे या दोन्ही विद्यापीठांना त्या ठिकाणी इन्क्युबेशन सेंटर सुरू करण्यासाठी जळगाव विद्यापीठाच्या केंद्राचे मार्गदर्शन घेण्याची सूचना शासनाच्यावतीने करण्यात आली आहे.

केसीआयआयएल केंद्राच्यावतीने जिल्हा प्रशासनात कृषी आणि ग्रामीण भागात बचत गटांना मार्गदर्शन करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय पातळीवर काही संस्थांशी समन्वय साधण्याचे काम देखील या केंद्राच्यावतीने जिल्हा प्रशासनाला करून दिले जाते. नंदूरबार या आदिवासी बहूल जिल्ह्यात नव उद्योग निर्माण व्हावे यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविले असून नोडल एजन्सी म्हणून केसीआयआयएलने काम करावे असा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. कुलगुरू प्रा. व्ही.एल.माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक प्रा.भुषण चौधरी, केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनवीन चढ्ढा आणि व्यवस्थापक निखील कुलकर्णी हे केंद्राचे काम पाहत आहेत. दरम्यान नव उद्योग उभारणीसाठी काही नावीन्यपूर्ण कल्पना असतील तर या केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन चढ्ढा यांनी केले आहे.

 

Protected Content