जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ‘नेक्सस २के २६’ (Nexus 2K26) हा फ्रेशर्स सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि जल्लोषाच्या वातावरणात संपन्न झाला. विविध मनोरंजक उपक्रम, सांस्कृतिक सादरीकरणे आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने या कार्यक्रमात मोठी रंगत आणली. या विशेष सोहळ्यात संगणक अभियांत्रिकी विभागाचा गौरव भोई ‘मिस्टर फ्रेशर’ तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागाची कुमुदिनी महाजन ‘मिस फ्रेशर’ म्हणून निवडण्यात आले.
कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात गोदावरी फाउंडेशनचे सदस्य व प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील, प्रमुख पाहुणे जळगाव आरटीओचे मोटर वेहिकल इन्स्पेक्टर तथा महाविद्यालयाचे २०१४ बॅचचे माजी विद्यार्थी निलेश पाटील, आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विभागांचे विभागप्रमुख, अधिष्ठाता, प्राध्यापकवृंद आणि प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ शैक्षणिक अभ्यासावर भर न देता सांस्कृतिक आणि सहशालेय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होण्याचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख पाहुणे निलेश पाटील यांनी आपल्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या काळातील आठवणींना उजाळा दिला. त्यांनी प्रथम व द्वितीय वर्षात योग्य निर्णय घेणे, सातत्याने स्वतःच्या कौशल्यांमध्ये वाढ करणे, वेळेचे अचूक नियोजन आणि विविध उपयुक्त छंद जोपासणे याविषयी विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
डॉ. अनिकेत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच व्यावसायिक जीवनात सॉफ्ट स्किल्स आणि आधुनिक व्यावसायिक कौशल्यांची असलेली गरज विशद केली. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी महाविद्यालय व संस्था सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर फ्रेशर्स पार्टीच्या मुख्य मनोरंजनात्मक सत्राला सुरुवात झाली. प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी डान्स, संगीत आणि विविध कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्याचे नेटके सूत्रसंचालन गौरव इंगळे, जिज्ञासा पाटील, संकेत बागड, सोनम गुंजाळ, मोहित चौधरी, रिद्धी भिरूड, राजश्री यादव, लल्लेश पाटील, निखिल पाटील, प्रणाली पाटील, ऋषिकेश पाटील, स्नेहल पाटील, हितेश चौधरी, मोहिनी जोशी, दिया चौधरी, चेतन चौधरी आणि आदेश जैस्वाल यांनी पार पाडले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रथम वर्ष विभागाचे प्रमुख डॉ. नितीन भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. या उत्कृष्ट आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील आणि डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) यांनी संपूर्ण टीमचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.



