जळगाव, प्रतिनिधी | श्री गणेशाच्या आगमनाने सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच रविवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास अचानक धुवाधार पावसाने हजेरी लावल्यामुळे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची चांगलीच दाणादाण उडाली होती.
पावसाच्या दमदार हजेरीमुळे शहरातील काही मंडळांच्या डेकोरेशमध्येदेखील पाणी घुसल्याचे दिसून आले. रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शहरात पावसाचे आगमन झाले. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे अनेकजण काहीना काही कामानिमित्ताने शहरात आलेले होते. अचानक पावसाला सुरुवात झाल्यामुळे शहरात आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने ब्रेक दिल्यामुळे अनेक जण छत्री, रेनकोट घरीच टाकुन आलेले होते. परंतु पाऊस सुरु झाल्यामुळे त्यांची घरी परततांना पंचाईत झाली. सर्वत्र सध्या गणरायाच्या आगमनामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, रविवारी अचानक पावसाला सुरुवात झाल्यामुळे गणेश मंडळांच्या सदस्यांना डेकोरेशन पावसापासून वाचवितांना कसरत करावी लागली. शहरातील नविपेठ भागात काही मंडळांच्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनमध्ये पाणीदेखील शिरले होेते.