जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील तिरळेपणा (भेंगडेपणा) व पडलेल्या पापणीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी जळगाव येथे तीन दिवसीय मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान, रोटरी ई-क्लब ऑफ गोदावरी ईलाईट आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ३, ४ आणि ५ एप्रिल रोजी हे शिबिर आयोजित करण्यात येणार असून या अभियानातून जळगाव जिल्हा तिरळेपणा मुक्त करण्याचा मानस असल्याचे डॉ. एन. एस. आर्विकर यांनी सांगितले.
या शिबिरात तिरळेपणा व पडलेल्या पापणीच्या आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. सलग तीन दिवसांमध्ये सुमारे १०० रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे या शस्त्रक्रिया पार पडणार असून पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानच्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम यासाठी जळगावमध्ये येणार आहे.

या शिबिरासाठी पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे प्रमुख नेत्रतज्ज्ञ व अध्यक्ष डॉ. मधुसूदन झंवर, सचिव व प्रमुख सर्जन डॉ. राजेश पवार, ओकुलोप्लास्टी सर्जन डॉ. रमेश भांगे तसेच प्रमुख भूलतज्ज्ञ डॉ. श्यामकांत कुलकर्णी यांच्यासह अनेक अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सहभागी होणार आहे. या टीममध्ये प्रमुख संयोजक डॉ. वैभव वनारसे, डॉ. सचिन गाडे, डॉ. संजीव राठोड, डॉ. आनंद खडके, डॉ. मनोज भायगुडे, डॉ. ललित शहा, डॉ. प्रवीण जगताप, डॉ. सचिन बगाडे, डॉ. उदय कुरुडकर, डॉ. अनिल वायकुळे, डॉ. राजेंद्र लोहारे, डॉ. नितीन भालेराव, डॉ. रवी देशमुख, भूलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र जाधव व डॉ. बंदल यांचा समावेश आहे.
तिरळेपणा हा लपवण्याचा नव्हे तर उपचार करून बरा होणारा आजार आहे. योग्य वेळी उपचार आणि शस्त्रक्रिया केल्यास रुग्णांचा आत्मविश्वास वाढतो तसेच दृष्टीही सुधारते, असे डॉ. आर्विकर यांनी सांगितले. समाजातील गरजू रुग्णांपर्यंत दर्जेदार नेत्रसेवा पोहोचविण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांचे संयुक्त प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
या अभियानाच्या नियोजनासंदर्भात आज डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिबिराचे नियोजन, रुग्णांची तपासणी आणि शस्त्रक्रियांच्या व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित, डॉ. रेणुका पाटील, डॉ. निखिल चौधरी तसेच नेत्ररोग विभागातील डॉक्टर आणि वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.



