Home आरोग्य पहूरमध्ये मोफत स्त्रीरोग व बालरोग निदान शिबिर ; ७० रुग्णांची तपासणी 

पहूरमध्ये मोफत स्त्रीरोग व बालरोग निदान शिबिर ; ७० रुग्णांची तपासणी 


पहूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागातील महिला व बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने पहूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत स्त्रीरोग व बालरोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण ७० रुग्णांची सखोल तपासणी करण्यात आली असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे अनेक रुग्णांना योग्य सल्ला व उपचारांची दिशा मिळाली.

पहूर येथील आई मल्टी स्पेशलिटी डे केअर सेंटरमधील डॉ. रवींद्र बडगुजर यांच्या दवाखान्यात क्षत्रिय माळी समाज संघटना पहूर कसबे आणि अनंत श्री उमन अँड चिल्ड्रन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. ग्रामीण भागात विशेषत: स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञांची कमतरता लक्षात घेता हे शिबिर नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले.

या शिबिरात जळगाव येथील नामांकित स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. मिहीर सुरेश चौधरी तसेच बालरोग व नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. भावना मिहीर चौधरी यांनी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली. महिलांच्या आरोग्यविषयक तक्रारी, गर्भारपणाशी संबंधित समस्या तसेच लहान मुलांच्या आजारांवर मार्गदर्शन करण्यात आले. तपासणीदरम्यान रुग्णांना आवश्यक त्या चाचण्या, औषधे व पुढील उपचारांचा सल्ला देण्यात आला.

या उपक्रमासाठी डॉ. असोसिएशन पहूर, मेडिकल असोसिएशन पहूर, युनिटी लॅब तसेच पहूर शहर पत्रकार संघटना यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमादरम्यान रामचंद्र वानखेडे, डॉ. मिहीर चौधरी आणि उपसरपंच राजू जाधव यांनी आपल्या मनोगतातून आरोग्याबाबत जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजू सोनवणे सर यांनी केले.

आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी पहूर शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष डॉ. संभाजी शिरसागर, उपाध्यक्ष जयंत जोशी, युनिटी लॅबचे डॉ. बोरसे, डॉ. जलाल शेख, डॉ. तायडे, डॉ. सागर पाटील तसेच आरोग्यदूत राहुल डेंगाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. आयोजकांच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत व तज्ज्ञ आरोग्यसेवेचा लाभ मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.


Protected Content

Play sound