जळगाव-लाईव्ह ट्रेंड न्युज प्रतिनिधी | जळगावातील निमखेडी रोड वरील कांताई नेत्रालयातर्फे मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी दोन दिवस नेत्रतपासणी विनामूल्य केली जाणार आहे. जळगावातील जे मतदार मतदान केल्याची डाव्या हाताच्या बोटावरील शाईची खूण दाखवतील, त्यांना नेत्र तपासणीत शंभर टक्के सूट दिली जाणार आहे. ही सवलत दि. १३ व १४ मे या कालावधी करिता मर्यादीत आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरिता कांताई नेत्रालयातर्फे ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे, या संधीचा जास्तीत जास्त जळगावकरांनी लाभ घ्यावा.
सर्व नेत्र रूग्णांना उच्च दर्जाची नेत्रसेवा उपलब्ध व्हावी हा उद्देशाने दि. १९ जानेवारी २०१६ रोजी कांताई नेत्रालयाची सुरवात करण्यात आली. जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या कांताई नेत्रालयात आधुनिक उपकरणे आणि अनुभवी डॉक्टरांची पुर्णवेळ उपलब्धता असून गेल्या आठ वर्षाच्या कालावधीत तीन लाखाहून अधिक नेत्ररूग्णांची नेत्रतपासणी आणि पंचवीस हजारहून अधिक यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया कांताई नेत्रालयाद्वारे केल्या गेल्या आहेत. कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना जैन ह्या रेटिना सर्जन असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कांताई नेत्रालयाची यशस्वी वाटचाल सुरु आहे. कांताई नेत्रालयातर्फे विनामूल्य नेत्रतपासणीसह ‘आय केअर ऑप्टीकल’ येथे चष्मा खरेदी वर दहा टक्के सवलत ही देण्यात आली. दि. १३ रोजी मतदान केल्यापश्चात अनेक मतदारांनी या संधीचा लाभ घेतला.