जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सोमाणी मार्केट, पिंप्राळा चौक येथे कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठान संस्था आणि गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले. या शिबिरामुळे डोळ्यांच्या विविध विकारांनी त्रस्त असलेल्या १००हून अधिक रुग्णांना मोठा दिलासा मिळाला.
संस्थेचे मार्गदर्शक चत्रभुज सोनवणे आणि जगन्नाथ बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव आणि महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. या शिबिराला जळगाव शहराच्या माजी महापौर सीमाताई भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. अभिजित काकड आणि डॉ. वरुण नन्नवरे या तज्ञ डॉक्टरांनी शिबिरात आलेल्या रुग्णांची सखोल तपासणी केली.

या शिबिरात १०० हून अधिक रुग्णांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली. यातील विशेष बाब म्हणजे, ज्या गरजू रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, त्यांची शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात येणार आहे, ज्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेऊ न शकणाऱ्या अनेकांना मोठा फायदा होणार आहे अशी माहिती प्रसिध्दी प्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी दिली.
या यशस्वी शिबिरासाठी संस्थेचे अध्यक्ष रविभाऊ कोळी, उपाध्यक्ष संजीव भाऊ बाविस्कर, सचिव अनिल कोळी, खजिनदार सुधाकर बाविस्कर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच, प्रमुख अतिथी म्हणून गोपाळशेठ नन्नवरे, संभाजी सोनावणे, गोकुळदादा सूर्यवंशी, सतीश सपकाळे, शिवाजी सूर्यवंशी, दीपक कोळी, रतन बिऱ्हाडे, भरत सपकाळे, जय सोनवणे, गणेश बाविस्कर, नरेंद्र सपकाळे आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



