ब्रह्मांडपुरीजी महाराजांतर्फे आयुर्वेदीक काढ्याचे मोफत वाटप

जळगाव प्रतिनिधी । कोरोनापासून बचाव करण्यासाठी ब्रह्मांडपुरीजी महाराजांनी अतिशय परिणामकारक असा आयुर्वेदीक काढा तयार केला असून याला विविध ग्रामपंचायतींच्या माध्यमातून मोफत वाटप करण्यात येत आहे.

दहिगावसंत (ता. पाचोरा) येथील परमहंसधाम येथील ब्रह्मांडपुरीजी महाराज यांनी कोरोनाच्या विषाणूवर लाभदायी ठरणार्‍या आयुर्वेदीक काढ्याची निर्मिती केली आहे. प्राचीन भारतीय परंपरेतील ज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आलेला हा काढा अतिशय गुणकारी असल्याची अनुभूती अनेकांना आली आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढत असून परिणामी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी याचा उपयोग होत असल्याची माहिती ब्रह्मांडपुरीजी महाराज यांनी दिली आहे. या काढ्याचे पाच दिवसांपर्यंत सेवन केल्यानंतर यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढीस लागत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. दहिगाव संत येथील ग्रामस्थांना या काढ्याचे वाटप करण्यात आले आहे. यानंतर आता हा काढा सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

सर्वात लक्षणीय बाब म्हणजे ब्रह्मांडपुरीजी महाराज यांनी लोकांसाठी हा काढा अगदी मोफत उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. तथापि, परमहंसधाम येथे यासाठी गर्दी न करता विविध ग्रामपंचायतींच्या माध्यमातून याचे वाटप करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामपंचायती अथवा स्वयंसेवी संस्थांनी काढ्यासाठी परमहंसधाम, दहिगाव संत, ता. पाचोरा येथे ९९२३०२०२८७ व ८८०५३०८४३९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ब्रह्मांडपुरीजी महाराज यांनी केले आहे.

Protected Content