गुंतवणूकीत जास्तीचे व्याज देण्याच्या नावाखाली व्यापाऱ्याची फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जिल्हापेठ परिसरात राहणाऱ्या व्यापाऱ्याला बँकेच्या कर्मचाऱ्याने गुंतवणूकीचे आमिष दाखवत जास्तीचे व्याज मिळवून देण्याचे सांगत ३९ लाख रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, विलास डोंगरलाल जैसवाल (वय-६९) रा. सागर आपर्टमेंट, जिल्हापेठ, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. शहरातील महाबळ येथील स्टेट बँकेत नोकरी करणारे प्रसाद सोनार यांच्याशी ३० डिसेंबर २०१८ रोजी त्यांची ओळख निर्माण झाली. त्यावेळी प्रसादने त्यांचा विश्वास संपादन करून स्टेट बँकेत व्याज व्यवस्थित मिळत नाही असे सांगून, मी सांगतो त्या ठिकाणी पैसे गुंतवा आम्हाला त्यातून १० ते १५ टक्के व्याज मिळते आणि त्यातून तुम्हाला ५ टक्के प्रतिमहिना व्याज देवून असे सांगितले. या आमिषाला विलास जैसवाल बळी पडले आणि प्रसाद सोनार आणि त्याचा मित्र विपुल लखीचंद चौधरी रा. धानोरे ता. चोपडा यांना वेळीवेळी एकुण ३८ लाख ८७ हजार ५०० रूपये दिले. दरम्यान, पैसे देवूनही कोणताही परतावा मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. याप्रकरणी शनिवारी २१ मे रोजी विलास जैसवाल यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी प्रसाद सोनार आणि त्याचा मित्र विपुल लखीचंद चौधरी रा. धानोरे ता. चोपडा यांच्यावर जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.

Protected Content