चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील ओझर येथील एका शेतकऱ्याची ४४ क्विंटल कापसाची खरेदी करून भामट्याने सव्वा चार लाखात शेतकऱ्याची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, “तालुक्यातील ओझर येथील कमलाकर उखा गुजर (वय-४८) हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास आहे. गुजर हे शेतकरी असून त्यांची ओझर शिवारात साडेचार एकर शेतजमीन आहे. दरवर्षी शेतात ते कपाशी, मका, ज्वारी या पिकाची लागवड करीत असतात. यंदाच्या हंगामात गुजरनी शेतात कपाशीची लागवड केलेली होती. कापूस वेचून झाल्यानंतर घरातच त्याची साठवणूक केली होती.
दरम्यान गुजर हे कापसाची विक्री करण्यासाठी प्रविण सुभाष देशमुख रा. शिवशक्ती नगर, टाकळी प्र.चा यांना विचारणा केली असता त्यांनी कापूस ९,६०० रूपये प्रति क्विंटल खरेदी करण्यासाठी होकार दिला. त्यानुसार प्रविण सुभाष देशमुख यांनी गुजर यांच्याकडून दि.२५ जानेवारी व २६ जानेवारी २०२२ अशा दोन दिवसात ४४.९८ क्विंटल ४,३१, ४२४ रूपयाच्या कापसाची खरेदी केली. खरेदी केल्यानंतर देशमुखांनी दोन-तीन दिवसात पैसे देण्याचे सांगितले. त्यानंतर गुजरने प्रविण देशमुखांकडे पैशाची मागणी केली.
त्यावर देशमुखांनी दोन तीन वेळा गुजरला चेक दिले. परंतु सदर चेक खाली असल्याने खात्यावर पैसे वर्ग होऊ शकले नाही. गुजर यांनी अधिक तपासणी केली असता देशमुख यांनी आजूबाजूच्या लोकांचीही अशाप्रकारे फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. आपलीही फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्थानक गाठले. प्रविण देशमुख यांच्याविरुद्ध भादवी कलम – ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे शेतकरी वर्गात एकच खळबळ उडाली असून पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.