जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतीचे बनावट कागदपत्रांसह बनावट शेतमालक उभा करुन सहाय्यक दुय्यम निबंधक अधिकारी कार्यालयात शेजमीन परस्पर खरेदी केल्याचा धक्कादाय प्रकार उघडकीस आला. तसेच यातील काही जमीन भुसांपादीत झाली असल्याने शासनाची देखील फसवणुक केली आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवड येथील रामदास भगवानदास पेसवाणी यांनी सन २०११ मध्ये नशिराबाद शिवारातील ४०.५ आर शेतजमीन कुमार ओमप्रकाश रेाहरा रा. शिक्रापुर ता. शिरुर, जि.पुणे यांच्याकडून हरेष देवनदास ललवाणी यांच्या मध्यस्तीने खरेदी केली होती. पेसवाणी यांनी जमीनीच्या चारही बाजुला तारेचे कंपाऊंट तयार करुन त्यांच्या मालकीचा बोर्ड लावलेला होता. या शेतजमीनीपैकी १२ आर जमीन ही राष्ट्रीय महामार्गासाठी भुसंपादित झाली असून त्याचा मोबदला पेसवाणी यांना अद्याप देखील मिळालेली नाही. डिसेंबर २०२३ मध्ये रामदास पेसवाणी यांना त्यांच्या नातेवाईकांनी नशिराबाद येथील जमीन बोगस कागदपत्राच्या आधारे खरेदीखत झाले असल्याचे सांगितल्यामुळे पेसवाणी यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
शेतजमीनीची खात्री करण्यासाठी पेसावणी यांचे भाऊ अजय पेसवाणी हे १६ जानेवारी रोजी नशिराबाद येथे गेले होते. यावेळी त्यांच्या भावाच्या जमीनीवर अजय कंडारे नामक इसमाने हॉटेल टाकलेले होते. त्यांनी ही बाब आपल्या भावाला सांगितल्यानंतर त्यांनी आपण त्या जमीनीचा व्यवहार केलेला नसल्याचे सांगितले. जमीन हडपण्यासाठी पाच जणांनी संगंनमताने बनावट कागदपत्रांसह जमीनाचे बनावट मालक उभा करुन पेसवाणींसह शासनाची फसवणुक केली. याप्रकरणी अजय सुरेश कंडारे, बनावट रामदास पेसवाणी रा. धुळे, महेंद्रसिंग प्रतापसिंग राजपुत रा. सावळदे ता. धुळे, सैय्यद अमीर सैय्यद नवाज रा. बळीराम पेठ, शेख हसन शेख बशिर रा. गेंदालाल मिल यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.