पिंगळवाडे शाळेच्या चार विद्यार्थ्यांना स्काऊटचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील जिल्हा परिषद शाळेच्या चार विद्यार्थ्यांनी स्काऊट अंतर्गत ‘कब’चा राज्यस्तरीय पुरस्कार मिळवून शाळेचे नाव उंचावले आहे. नुकताच हा पुरस्कार मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आला आहे.

राज्य भारत स्काऊट-गाईड कार्यालयातर्फे जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील स्काऊटच्या ‘कब-बुलबुल’ पथकांचे तीन दिवसांचे निवासी राज्यस्तरीय चाचणी शिबिर हस्ती भवन, दोंडाईचा (जि. धुळे) येथे २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले होते. या राज्यस्तरीय चतुर्थ चरण चाचणी (कब) आणि हिरकपंख (बुलबुल) शिबिरात तीन जिल्ह्यांतील ८९ कब (मुले) आणि ५७ बुलबुल (मुली) असे एकूण १४६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

पिंगळवाडे येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक आणि कब मास्टर दत्तात्रय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी कब राज्यस्तरीय चतुर्थ चाचणी पुरस्कार शिबिरात सहभाग घेतला. गिरीश किशोर चव्हाण (तिसरी), हर्ष समाधान पाटील (चौथी), राजवीर संजय पाटील (चौथी) आणि सम्राट भूषण कोळी (चौथी) या चार विद्यार्थ्यांनी दोंडाईचा येथील राज्यस्तरीय चाचणी शिबिरात यशस्वी कामगिरी केली. तीन दिवसांच्या निवासी शिबिरात या चारही विद्यार्थ्यांनी लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये अव्वल स्थान मिळवून राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी ठरले.

कब विभागात जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची एकमेव शाळा म्हणून नियमितपणे राज्य पुरस्कार चाचणी परीक्षेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी करून घेतल्याबद्दल कब मास्टर दत्तात्रय सोनवणे यांचे शिबिर प्रमुख जीवन मटके (ठाणे) यांनी विशेष कौतुक केले. तिसरीतील विद्यार्थी गिरीश किशोर चव्हाण याने लेखी आणि तोंडी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवले.

या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, डायटचे प्राचार्य अनिल झोपे, स्काऊट जिल्हा मुख्य आयुक्त आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, जिल्हा सचिव सरला पाटील, जिल्हा सहसचिव डी.एस. सोनवणे, गाईडच्या जिल्हा संघटक हेमा वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिर प्रमुख जीवन मटके, संगीता रामटेके, जिल्हा स्काऊट-गाईड संघटक सुधाकर साखरे (नंदुरबार), जयवंता असोले (धुळे), हेमा वानखेडे (जळगाव), नरेश सावंत (दोंडाईचा), कब मास्टर दत्तात्रय सोनवणे (जळगाव), संदीप पाटील (नंदुरबार), जितेंद्र आव्हाड (धुळे), फ्लॉकलिडर सीमा पाटील (जळगाव), ललिता भामरे (नंदुरबार) यांच्या उपस्थितीत शिबिर यशस्वी झाले. कब मास्टर दत्तात्रय सोनवणे यांना शाळेतील मुख्याध्यापिका वंदना ठेंग, शिक्षक प्रवीण पाटील, रवींद्र पाटील आणि वंदना सोनवणे यांनी सहकार्य केले.

Protected Content