जळगाव प्रतिनिधी । सीआरपीएफ जवानाला लिप्ट देवून एरंडोल तालुक्यातील भालगाव फाट्यावर चाकूचा धाक दाखवून रोकड, मोबाईल व बॅगची लुटमार करणाऱ्या चार दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी एरंडोल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, सीआरपीएफमध्ये कार्यरत जवान श्रीकांत शांताराम माळी (रा.सावित्रीनगर, पारोळा) हे सुटीवर घरी निघाल्यानंतर 18 नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री ते रेल्वेने जळगावात आले. त्यानंतर जळगावातील आकाशवाणी चौफुलीवर ते पारोळ्याला जाण्यासाठी थांबले. तेथून तवेरा वाहनाने ते मध्यरात्री पारोळ्याला जाण्यासाठी निघाले. एरंडोल शहराच्या पुढे भालगाव फाटा येथे चालकाने तवेरा गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. यानंतर चालकासह त्याच्या सोबतच्या संशयीतांनी माळी यांना चाकूचा धाक दाखवून साडेतीन हजार रुपये व तीन हजार रुपयांचा मोबाइल व बॅग हिसकावली. बॅगेत त्यांचा युनिफॉर्म, एटीएम कार्ड व महत्त्वाची कागदपत्रे होती. लुटीनंतर संशयीत पारोळ्याकडे पसार झाले. या संदर्भात जवान श्रीकांत माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी तांत्रिक विश्लेषणच्या आधारे संशयित आरोपी मनोज रमेश पगारे, आकाश राजेंद्र जगताप, प्रशांत अशोक वाघ, विशाल राजेश मोरे (सर्व रा.मालेगाव, जि.नाशिक) यांना गुरूवारी ६ जानेवारी रोजी सकाळी मालेगावहून अटक केली आहे. ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशरफ शेख, नाईक नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील, सचिन महाजन, चालक अशोक पाटील आदींच्या पथकाने केली.