पंचवटीतील तरूणाच्या हत्येप्रकरणी महिलेसह चार जणांना अटक

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंचवटीत दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीतील पंजाबराव देशमुख वसतिगृहामागे बुधवारी पहाटे २५ वर्षाच्या युवकाची हत्या करण्यात आली. गगन प्रवीण कोकाटे असे मयत युवकाचे नाव असून हत्येसाठी महिलेने दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचे उघड झाले. पंचवटी पोलिसांनी अवघ्या पाच तासात या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले. मयत युवक हा सेवानिवृत्त पोलिसांचा मुलगा आहे. पथकांनी संकेत रणदिवे, मेहफुज सय्यद, रितेश सपकाळे, गौतम दुसाने यांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता गगन याच्या हत्येसाठी भावना कदम हिने दोन लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी भावना हिलाही ताब्यात घेतले. भावना कदम विवाहित असून एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्या माध्यमातूनच त्यांची संकेत, मेहफुज, रितेश आणि अन्य लोकांशी ओळख झाली. चारही मुले सामान्य कुटुंबातील असून सातपूर औद्योगिक वसाहतीत कामगार आहेत. केवळ पैशांच्या लोभापायी त्यांनी गुन्ह्यात सहभाग घेतला.

पंचवटीत राहत असलेला गगन कोकाटे आणि भावना कदम यांची मैत्री होती. मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. पुढे गगन हा भावना हिला सातत्याने त्रास देऊ लागला. पंचवटी परिसरातील पंजाबराव देशमुख वसतिगृहामागे गगन याला बुधवारी पहाटे बोलविण्यात आले. त्या ठिकाणी संशयितांनी धारदार शस्त्राने हल्ला करुन गगनची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, पंचवटी विभागाच्या सहायक आयुक्त पद्मजा बढे, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड घटनास्थळी दाखल झाले. संशयितांच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा विभाग एकच्या पथकानेही घटनास्थळी भेट देत तपास सुरु केला. निरीक्षक कड यांना संशयित हे अशोकनगर परिसरातील असल्याचे समजले. संशयितांना ताब्यात घेण्यासाठी महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.

Protected Content