नाशिकमध्ये आयशर-कारच्या धडकेत चार जणांचा मृत्यू

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथे भीषण अपघात झाला आहे. नाशिक- मुंबई महामार्गावरील आडगावमध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला आहे. आयशर टेम्पो हा समोरच्या बाजूने अचानक दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या लेनमध्ये घुसून समोरून येणाऱ्या ब्रिझा कारवर जाऊन आदळल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत चौघे हे नाशिकच्या सिडको परिसरातील राहणारे आहेत. टेम्पो हा विरुद्ध दिशेने येत असतांना हा अपघात झाला आहे.या दुर्घटनेत रहेमान सुलेमान तांबोळी, त्यांचा भाचा अरबाज चांदुभाई तांबोळी, सीज्जू पठाण, अक्षय जाधव अशी या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई-आग्रा महामार्गावरून नाशिककडून आडगावकडे एक आयशर ट्रक हा कोंबड खत घेऊन जात होता. हा ट्रक शुक्रवारी (दि.१२) रात्री ११ च्या सुमारास नाशिक आडगाव मुंबई महामार्गाने विरुद्ध दिशेने जात होता. ट्रकचालकाने दारू प्यायली असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अवस्थेत त्याने विरुद्ध दिशेने वेगाने ट्रक चालवत असतांना त्याचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक दुभाजकावर तोडून थेट विरुद्ध बाजूच्या नाशिक लेनवर जाऊन समोरून येणाऱ्या ब्रिझा कारला जाऊन धडकला. या भीषण अपघातात कार मधील चौघे जागीच ठार झाले. तर ट्रक चालक व क्लीनर जखमी झाले आहेत.

Protected Content