पहूर, ता.जामनेर, प्रतिनिधी | येथील संतोषी माता नगरातील बंद असलेल्या चार घरे फोडून चोरी झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे.
काल दि.३ नोव्हेंबर रात्री व ४ नोव्हेंबर सकाळी साडेसहा वाजेदरम्यान येथील संतोषी माता नगरातील कुंभार यांच्या घरातील भाडेकरू ,पत्रकार शरद बेलपत्रे, शिक्षक विकास पाटील व बांधकाम व्यावसायिक सुनील कुमावत यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटय़ांनी लाखाचा ऐवज लंपास केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील संतोषी माता नगरातील रहिवासी सध्या सुटीवर असलेले किरण बर्गे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. तर शिक्षक विकास पाटील हेही दिवाळी निमित्त शाळेस सुटी असल्याने तेही पिंपळगाव येथे गेल्याने त्यांच्याही बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटाचे काच फोडून कपाटातील कपडे अस्ताव्यस्त करून दहा हजार तीनशे रुपये रोख व सोने असे २५ हजार ३०० रूपये, तर पत्रकार शरद बेलपत्रे हेही काल शेगाव येथे गेले असल्याने त्यांच्या बंद घराचे कोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाट तोडून व कपाटातील कपडे अस्ताव्यस्त करून दिड तोळे सोन्याचे दागिने व बारा हजार रुपये रोख असे एकूण ७२ हजार रूपयांची अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. येथील सुनील कुमावत यांच्या घराचा कोयंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. तसेच जळगाव येथील ठसे तज्ञ यांनाही बोलविण्यात आले होते.
दोन संशयित ताब्यात
दरम्यान, एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी करून तब्बल एक लाख रुपयांचा ऐवज लंपास अज्ञात चोरटय़ांनी केला. याबाबत दोन संशयित आरोपी यांना पहूर पोलीसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. अमोल देवढे, ए.एस.आय. अनिल अहिरे, अनिल राठोड, प्रविण देशमुख हे करीत आहे.