रस्त्यावरील खड्डयातील साचलेल्या पाण्यात चार मुली बुडल्या; एकीचा मृत्यू, तीन बचावल्या

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कात्रज-कोंढवा रस्त्यावर खड्ड्यात साचलेल्या पाण्यात चार मुली बुडाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलींना बाहेर काढले. त्यापैकी एक मुलगी खोल पाण्यात बुडाल्याने तिचा मृ्त्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुस्कान शिलावत असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. सरगम शिलावत, सेजल शिलावत, जानू शिलावत अशी बचावलेल्या मुलींची नावे आहेत.

कात्रज-कोंढवा रस्त्यावर इस्कॉन मंदिरात परिसरात भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. या भागात चार ते पाच झोपड्या आहेत. तेथे एका खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा वापर झोपडीतील रहिवासी करतात. मुली तेथे राहायला आहेत. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास मुस्कान, सरगम, सेजल, जानू साचलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी पाय घसरल्याने चौघी मुली पाण्यात बुडाल्याची माहिती अग्निशमन दलाला तेथील रहिवाशांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कोंढवा अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख समीर शेख, समीर तडवी, दशरथ माळवदकर, प्रकाश शेलार, अभिजीत थळकर, विश्वजीत वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली.

जवानांनी पाण्यात बुडालेल्या मुस्कान, सरगम, सेजल, जानू यांना बाहेर काढले एक मुलगी खोल पाण्यात बुडाली होती. खड्ड्यात चिखल मोठ्या प्रमाणावर होता. नाका तोंडात पाणी गेल्याने मुस्कान बेशुद्ध पडली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच ती मरण पावल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बेशुद्धावस्थेतील एका मुलीला रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख समीर शेख यांनी दिली.

Protected Content