Home क्राईम बनावट कॉल सेंटर प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हे यांना न्यायालयीन कोठडी !

बनावट कॉल सेंटर प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हे यांना न्यायालयीन कोठडी !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात ममुराबाद रस्त्यावरील एल.के. फार्म येथे सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटर प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी अटकेत असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून, त्यापैकी ८ जणांना अटक करण्यात आली आहे, तर तीन मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहेत.

विदेशातील नागरिकांची फसवणूक
या बनावट कॉल सेंटरवरून अमेरिका, कॅनडा, इंग्लंडसह अन्य देशांतील नागरिकांना लक्ष्य करून त्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केली जात होती. २८ सप्टेंबर रोजी पोलिसांनी छापा टाकून ३१ लॅपटॉप जप्त केले. प्राथमिक तपासात, केवळ दोन दिवसांत ६७ परदेशी नागरिकांना कॉल झाल्याचे उघड झाले. मात्र, गेल्या १२ दिवसांत हे प्रमाण ६५० पेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांवर रोज कॉल डेटा डिलीट करण्याची सक्ती होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

फरार आरोपी व तपास केंद्रीय यंत्रणांकडे?
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेले ऋषी बेरिया, अकबर खान आणि आदिल सय्यद हे तिघे अद्याप फरार आहेत. ते विदेशात पळून जाऊ नयेत यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाने त्यांच्याविरुद्ध ‘लूक आउट नोटीस’ जारी केली आहे. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.

रेड्डी यांनी सांगितले की, फसवणूक झालेल्या विदेशी नागरिकांशी जळगाव पोलीस दल संपर्क साधून त्यांच्या तक्रारींसंदर्भात विचारणा करणार आहे. विदेशातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्यामुळे या प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडे सोपविण्याबाबतच्या हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, पोलिसांनी याला अद्याप दुजोरा दिलेला नाही.

पोलिसांवर ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’चा आरोप
या प्रकरणात अटकेत असलेल्या ललित कोल्हे यांना पोलीस कोठडीत ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ मिळाल्याचा आरोप झाल्यानंतर मोठा गदारोळ झाला. या आरोपानंतर पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांची तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. तसेच, या तपासावर राजकीय हस्तक्षेप झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. एका मंत्र्याने कोल्हे यांना ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ देण्यासाठी तर दुसऱ्या मंत्र्याने कठोर कारवाईसाठी पोलिसांना फोन केल्याचा आरोप आहे. मात्र, पोलीस अधीक्षकांनी राजकीय हस्तक्षेपाचे हे सर्व आरोप फेटाळले आहेत.


Protected Content

Play sound