Home क्राईम जळगावमध्ये पोलीस ठाण्यातच भाजपच्या माजी नगरसेवकावर हल्ला ; दोन गटांत हाणामारी

जळगावमध्ये पोलीस ठाण्यातच भाजपच्या माजी नगरसेवकावर हल्ला ; दोन गटांत हाणामारी


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यातच दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. तक्रार देण्यासाठी आलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांना पोलीस ठाण्याच्या आवारातच मारहाण झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस ठाण्यात मोठा गोंधळ उडाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक नगर परिसरात भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांचा आणि काही तरुणांच्या गटामध्ये वाद झाला होता. हा वाद वाढल्यानंतर माजी नगरसेवक कैलास सोनवणे हे काही कार्यकर्त्यांसह तक्रार नोंदवण्यासाठी शनिपेठ पोलीस ठाण्यात गेले होते. दरम्यान, दुसऱ्या गटातील काही तरुण देखील पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर दोन्ही गट आमनेसामने आल्याने वाद उफाळून आला आणि पोलीस ठाण्याच्या परिसरातच हाणामारी झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह त्यांच्या सोबतच्या काही जणांना मारहाण झाल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेनंतर दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला. माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांनी देखील दुसऱ्या गटातील तरुणांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस ठाण्यात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन्ही गटांना वेगळे केले. त्यानंतर माजी नगरसेवकांना पोलीस वाहनातून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. या घटनेनंतर शनिपेठ पोलीस ठाणे परिसरात राखीव पोलीस दलाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्वतः शनिपेठ पोलीस ठाण्यात भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली असून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांच्या मते, या दोन गटांमधील वादाला आगामी महानगरपालिका निवडणुकीची किनार असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मनपातील काही टेंडर मिळविण्याच्या मुद्द्यावरून वाद वाढला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले असावे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून दोन्ही गटांतील एकूण दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली. दरम्यान, पोलीस ठाण्यातच झालेल्या या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर चर्चा सुरू झाली असून शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


Protected Content

Play sound