गडचिरोली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गडचिरोली वनविभागात पुन्हा एक रोपवन लागवड घोटाळा उघड झाला असून याप्रकरणी चातगाव वनपरीक्षेत्र अधिकारी संजय पडवे यांना निलंबित करण्यात आले आहे. पडवे यांच्या गैरव्यवहाराची वरिष्ठ स्तरावर तक्रार करण्यात आली होती. चौकशीत ते दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
गडचिरोली वनवृत्तातील वनविभाग गडचिरोलीअंतर्गत चातगाव वनपरिक्षेत्राचा समावेश होतो. मार्च २०२१ ते २०२४ पर्यंत करण्यात आलेली रोपवन लागवड, हेक्टरी मोजमाप, हेक्टरी लावण्यात आलेली झाडे आणि जगविलेली झाडे, प्रत्यक्ष लागवड न करता पैशाची उचल करणे असे अनेक आरोप ठेवत भारतीय जनसंसदचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी तक्रार केली होती. प्रत्येक कामावर लावलेल्या मजुरांचे व्हाऊचर, मजुरांच्या सह्यांची खात्री करणे, मोजमाप पुस्तिका, प्रत्येक मजुराची प्रत्येक कामावरील बँक खाते पुस्तिका तपासून घेतल्यास हा घोळ स्पष्टपणे दिसणार असल्याचे त्यांनी वनमंत्री, वन सचिवांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते. याशिवाय साहित्य खरेदीमधील कोटेशन, जीएसटीची बिले तपासण्याची मागणी केली होती. वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या निर्देशावरून वनरक्षक, वनपालांनी अनेक कामांवर अनेक बोगस मजूर दाखवून शासकीय निधी हडप केला असल्याची चर्चा होती. याशिवाय चातगाव वनपरिक्षेत्रात अतिक्रमण, अवैध उत्खनन, वृक्षतोडही झाल्याचा संशय होता.
दरम्यान, पडवे यांनी वनपालामार्फत आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशीही मागणी खरवडे यांनी केली होती. दरम्यान मुख्य वनसंरक्षक एस.रमेशकुमार यांनी या तक्रारीची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी केली. त्यात पडवे दोषी आढळले. प्रधान सचिवांच्या निर्देशानुसार निलंबनाची कारवाई केल्याचे रमेशकुमार यांनी सांगितले.