भारताच्या इतिहासात प्रथमच एकाच दिवशी बॅडमिटनमध्ये तीन पदके

पॅरीस-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारताने सोमवारी एकाच दिवशी बॅडमिंटनमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई केल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी दुपारी नितेश कुमारने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. त्यानंतर भारताच्या मुरुगेशन थुलासीमातीने रौप्यपदकाची कमाई केली आणि त्याचबरोबर रामदास मनीषाने कांस्यपदक पटकावले.

भारताच्या नितेश कुमारने ग्रेट ब्रिटनच्या बेथेल डॅनियलला तीन गेम्समध्ये पराभूत केले. नितेशने बेथेलला २१-१४, १८-२१ आणि २३-२१ असे पराभूत केले आणि भारताला सुवर्ण पदक जिंकून दिले.

भारताची मुरुगेशन ही अंतिम फेरीत पोहोचली होती. पण अंतिम फेरीत तिला चीनच्या यांग हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. चीनच्या यांगने मुरुगेशनला २१-१७, २१-१० असे पराभूत केले. त्यामुळे यांगला सुवर्णपदक जिंकता आले, तर मुरुगेशनला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

रामदास मनीषाने डेन्मार्कच्या कॅथेरीनवर २१-१२, २१-८ असा विजय मिळवला आणि कांस्यपदक आपल्या नावावर केले. भारताच्या इतिहासात ही गोष्ट प्रथमच घडली आहे. एकाच दिवशी भारताला बॅडमिंटनमध्ये एवढ्या मोठ्या स्पर्धेत एकाच दिवशी तीन पदकं जिंकता आलेली नव्हती. पण पॅरिसमध्ये मात्र भारताने ही कसर पूर्णपणे भरून काढली आहे.

Protected Content