Home प्रशासन मुक्ताईनगरमध्ये पुन्हा रद्दी पेपरवर खाद्यपदार्थ ; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच

मुक्ताईनगरमध्ये पुन्हा रद्दी पेपरवर खाद्यपदार्थ ; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच

0
17


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अन्नपदार्थ वर्तमानपत्रावर ठेवू नयेत, गुंडाळू नयेत किंवा सर्व्ह करू नयेत, असे अन्न सुरक्षा यंत्रणेकडून वारंवार स्पष्ट करण्यात आले असतानाही मुक्ताईनगर शहरात या नियमांना हरताळ फासला जात असल्याचे चित्र पुन्हा समोर आले आहे. शहरातील हॉटेल, नाश्त्याची दुकाने, टपऱ्या आणि विविध खाद्यविक्री केंद्रांवर वडा, भजी, समोसे, पकोडे यांसारखे गरम व तेलकट पदार्थ छापील रद्दी वर्तमानपत्रावर देण्याचा प्रकार सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण अर्थात FSSAI ने वर्तमानपत्राचा खाद्यपदार्थांच्या पॅकिंगसाठी, गुंडाळण्यासाठी, सर्व्ह करण्यासाठी किंवा तळलेल्या पदार्थातील अतिरिक्त तेल शोषण्यासाठी वापर करण्यास मनाई केली आहे. वर्तमानपत्राच्या छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या शाईतील रसायने, संभाव्य जड धातू तसेच कागदाच्या अस्वच्छतेमुळे खाद्यपदार्थ दूषित होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः गरम आणि तेलकट पदार्थ वर्तमानपत्रावर ठेवले असता शाईतील घटक अन्नपदार्थात मिसळण्याची शक्यता असल्याने हा प्रकार आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक मानला जातो.

मुक्ताईनगरमध्ये काही काळ अन्न सुरक्षा नियमांच्या पालनाबाबत दक्षता घेतली जात असल्याचे दिसून आले होते. अनेक खाद्यविक्रेत्यांकडून वर्तमानपत्राऐवजी सुरक्षित कागद किंवा फूड-ग्रेड साहित्याचा वापर केला जात होता. मात्र प्रशासनाची पाहणी आणि कारवाईचा धाक कमी झाल्यानंतर पुन्हा जुन्याच पद्धतीने रद्दी वर्तमानपत्रावर खाद्यपदार्थ देण्याचे प्रकार सुरू झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

यामुळे प्रशासनाची कारवाई केवळ काही दिवसांपुरतीच मर्यादित होती का, असा सवाल उपस्थित होत आहे. कारवाई झाल्यानंतर काही काळ नियमांचे पालन करायचे आणि त्यानंतर पुन्हा नियम धाब्यावर बसवायचे, अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. केवळ सूचना देऊन किंवा एखाद्या दिवशी तपासणी करून हा प्रश्न सुटणार नसून सातत्यपूर्ण निरीक्षण आणि नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याची नागरिकांची मागणी आहे.

दरम्यान, जून २०२६ मध्ये मुंबईत खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळणाऱ्या विक्रेत्यांविरोधात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान सुमारे ५५ खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २६ ठिकाणी वर्तमानपत्राचा वापर आढळून आल्यानंतर संबंधित आस्थापनांविरोधात अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली होती. महानगरात नियमांची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकते, तर मुक्ताईनगरसारख्या शहरात अशा प्रकारांकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शहरातील बाजारपेठ, मुख्य रस्ते तसेच विविध खाद्यविक्री केंद्रांवर संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे अचानक तपासणी करणे गरजेचे आहे. एखाद्या खाद्यविक्रेत्याला केवळ तोंडी सूचना देऊन विषय संपविण्याऐवजी नियमांचे उल्लंघन पुन्हा आढळल्यास कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली गेली पाहिजे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन यांच्यात समन्वय ठेवून विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.

या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासनाची भूमिकाही चर्चेत आली आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी खाद्यविक्री करणाऱ्या आस्थापनांमध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन होते की नाही, याची नियमित पाहणी करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासन केवळ संबंधित विभागाकडे बोट दाखवणार की अन्न व औषध प्रशासनाच्या समन्वयाने प्रत्यक्ष कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अन्न सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी आणि नियमभंग करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यावर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भर दिल्याचे दिसून येते. त्यांच्या कठोर भूमिकेमुळे अन्न सुरक्षा नियमांच्या पालनाबाबत प्रशासनाकडून अधिक गांभीर्याने कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र राज्यातील मोठ्या शहरांमध्ये कारवाई होत असताना मुक्ताईनगरसारख्या शहरातही त्याच पद्धतीने तपासणी आणि कारवाईचा धाक निर्माण होणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

“रद्दी पेपरवर खाद्यपदार्थ देणे बंद करा” हा नियम केवळ कागदावर राहता कामा नये. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी अन्न मिळणे हा सार्वजनिक आरोग्याशी निगडित महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे मुक्ताईनगर शहरातील हॉटेल, नाश्त्याची दुकाने, टपऱ्या आणि इतर खाद्यविक्री केंद्रांची तातडीने तपासणी करून वर्तमानपत्राचा वापर करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेष म्हणजे, रद्दी वर्तमानपत्राचा वापर हा केवळ स्वच्छतेचा प्रश्न नसून अन्नाच्या गुणवत्तेशी आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. त्यामुळे एखादी गंभीर आरोग्यविषयक घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होण्याची वाट न पाहता प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मुक्ताईनगरमध्ये अन्न सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियमित तपासणी, जनजागृती आणि नियमभंग करणाऱ्यांवर सातत्यपूर्ण कारवाई हा त्रिसूत्री उपाय महत्त्वाचा ठरणार आहे.


Protected Content

Play sound