Home Cities भुसावळ बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी वरणगावात १२५ गरजूंना अन्नदान 

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी वरणगावात १२५ गरजूंना अन्नदान 

0
1

वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त वरणगाव रोडवरील रेल्वे स्टेशन परिसरातील कट्टर शिवसैनिक उमाकांत शर्मा (नमा) यांच्या शिवभोजन केंद्रात १२५ गरीब व गरजू नागरिकांना मोफत जेवण आणि दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. बाळासाहेबांच्या समाजसेवेच्या विचारांना अभिवादन करत शिवसैनिकांनी अन्नदानाचा उपक्रम राबवून स्मृतिदिन साजरा केला.

या उपक्रमाची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. शहरप्रमुख गणेश चौधरी आणि ज्येष्ठ शिवसैनिक शरद जैस्वाल यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी धूप-दीप लावून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित शिवसैनिकांनी ‘अमर रहे, अमर रहे, बाळासाहेब अमर रहे’, तसेच ‘परत या साहेब, परत या साहेब’ अशा घोषणा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. यानंतर सकाळी ११.३० वाजता अन्नदानाच्या उपक्रमाला सुरुवात झाली. परिसरातील १२५ गरीब व गरजू नागरिकांना मोफत जेवण देण्यात आले. तसेच दिवाळी फराळाचा गोडवा जपत शेव आणि बुंदीचेही मोफत वाटप करण्यात आले. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक प्रा. उत्तम सुरवाडे, उपशहरप्रमुख राकेश खरारे, शिवसैनिक अॅड. मिलिंद कापडे, अरुण साळुंखे, अन्सार शाह, पीयूष शर्मा यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते. याप्रसंगी उमाकांत शर्मा (नमा) यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, बाळासाहेबांसारखा देवमाणूस पुन्हा होणे शक्य नाही. मात्र, साहेब आजही प्रत्येक कट्टर शिवसैनिकाच्या हृदयात जिवंत आहेत आणि कायम राहतील. त्यांनी शिवसैनिकांना दिलेली शिकवण आणि दाखवलेली दिशा आजही मार्गदर्शक आहे.

बाळासाहेबांनी दिलेला ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हा विचार शिवसैनिकांनी प्रत्यक्ष कृतीतून जपला पाहिजे. आम्ही शिवसैनिक म्हणून आजही याच विचाराने काम करीत आहोत आणि भविष्यातही समाजसेवेचे हेच कार्य सुरू ठेवू, असे शर्मा यांनी सांगितले. समाजकारणाला प्राधान्य देण्याची शिकवण बाळासाहेबांनी दिली असून, गरजूंची सेवा करणे हेच त्यांना खरे अभिवादन असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी शिवसैनिक विभागप्रमुख अरुण साळुंखे यांनी उपस्थितांचे आभार मानले. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी राबविण्यात आलेल्या या अन्नदान उपक्रमातून शिवसैनिकांनी समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. १२५ गरजूंना जेवण आणि फराळाचे वाटप करून स्मृतिदिन सामाजिक बांधिलकीने साजरा करण्यात आला.


Protected Content

Play sound