मुंबई प्रतिनिधी । यंदा दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खवा, मावा, मिठाई, तेल, तुपासह इतर पदार्थ बाजारात दाखल झाले असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. दिवाळीच्या दिवसात राज्यभरातून जवळपास २६ कोटी रुपयांचे भेसळयुक्त अन्नपदार्थ प्रशासनाने जप्त केले आहेत.
राज्यातून १ हजार ९५८ किलो भेसळयुक्त खवा किंवा मावा प्रशासनाने जप्त केला असून ११६ नमुने गोळा केले आहेत. सर्वाधिक भेसळयुक्त खवा नाशिक (८७७ किलो) आणि नागपूरमध्ये (६४४ किलो) आढळला आहे. ३ हजार किलो भेसळयुक्तमिठाई प्रशासनाने ताब्यात घेतली असून यात अमरावती (१,३७६ किलो) आणि ठाणे(१,४२८ किलो) भागात अधिक प्रमाणात सापडली आहे. या मोहिमेमध्ये जवळपास वीस हजार किलो तेल, तूप, वनस्पती जप्त करण्यात आले आहे. पुण्यात सर्वाधिक (१२ हजार ०२१ किलो) आणि त्याखालोखाल नागपूरमधून (७,९२० किलो) भेसळयुक्त तूप, तेल आढळले. १ हजार ४५८ किलो इतर भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त केले. मुंबईत मात्र कोणतेही पदार्थ भेसळयुक्त आढळलेले नाहीत, असे आकडेवारीत नमूद आहे. राज्यभरातून २६ कोटी ३५ हजार रुपयांचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त झाले असून खवा(११६), मिठाई (३८५), तेल-तूप (३५१) आणि इतर अन्नपदार्थाचे (४७४) नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.