जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा आता अत्यंत चुरशीचा झाला असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मतदानाला केवळ दोन दिवस शिल्लक असताना महायुतीच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा वेग प्रचंड वाढवला आहे. सोमवारी १२ जानेवारी रोजी सकाळी विद्युत कॉलनी परिसरात शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी (महायुती) समर्थित उमेदवारांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले.

फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी :
माजी आमदार चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली होती. ठिकठिकाणी स्थानिक नागरिकांनी आणि महिलांनी उमेदवारांचे औक्षण केले, तर काही ठिकाणी फुलांची उधळण करून जंगी स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आवाजात कार्यकर्त्यांनी केलेला जल्लोष विजयाचा विश्वास अधोरेखित करत होता.

उमेदवारांचा झंझावात :
या रॅलीत महायुतीच्या उमेदवार डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे, सिंधुताई विजय कोल्हे आणि संतोष मोतीराम पाटील यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन मतदारांशी संवाद साधला. “शहराचा विकास आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे,” असा विश्वास यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला. मात्र, काही अपरिहार्य कारणास्तव महायुतीचे उमेदवार ललित विजय कोल्हे या रॅलीत सहभागी होऊ शकले नाहीत, तरीही त्यांच्या समर्थकांनी रॅलीत मोठी उपस्थिती दर्शवून प्रचाराची धुरा सांभाळली.
शेवटच्या टप्प्यात ‘हायव्होल्टेज’ प्रचार :
निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने उमेदवारांनी आता घराघरांत पोहोचण्यावर भर दिला आहे. डॉ. अमृता सोनवणे, सिंधुताई कोल्हे आणि संतोष पाटील यांनी प्रचाराचा जोर वाढवत ‘कॉर्डन मीटिंग’ आणि पदयात्रांच्या माध्यमातून मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. विद्युत कॉलनीतील या शक्तीप्रदर्शनामुळे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली असून, महायुतीचे पारडे जड असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.



