रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर येथील श्री व्ही. एस. नाईक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेसाठी पाच खेळाडूंची निवड कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघात करण्यात आली आहे. या निवडीमुळे महाविद्यालयासह रावेर तालुक्याचा क्रीडा क्षेत्रात सन्मान वाढला आहे.
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांदो स्पर्धा १६ ते २० मार्च दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. महिलांची स्पर्धा ओडिशा राज्यातील बालासोर येथे तर पुरुषांची स्पर्धा पंजाबमधील जालंधर येथे पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघात श्री व्ही. एस. नाईक महाविद्यालयातील चार महिला आणि एका पुरुष खेळाडूची निवड झाली आहे.

महिला गटातून अनुश्री वाणी, जागृती अटवाडे, नंदिनी महाजन आणि मानसी पाटील या चार खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तर पुरुष गटातून पुष्पक महाजन या खेळाडूची निवड झाली आहे. या पाचही खेळाडूंनी विद्यापीठ स्तरावरील निवड चाचण्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष हेमंतशेठ नाईक, संस्थेचे सदस्य डॉ. प्रतीक नाईक, प्राचार्य डॉ. अनिल पाटील तसेच उपप्राचार्य प्रा. एस. यू. पाटील यांनी खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेला पुढे नेण्याचे काम या खेळाडूंनी केले असून राष्ट्रीय स्तरावरही ते उत्तम कामगिरी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच प्रा. संदीप धापसे, डॉ. नीता जाधव, क्रीडा समितीचे सदस्य प्रा. चतुर गाडे, प्रा. सत्यशील धनले, प्रा. सागर महाजन आणि तेजस दसनुरकर यांनीही निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. उमेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळाल्याचे सांगितले जात आहे.
या यशामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि क्रीडाप्रेमींनी खेळाडूंचे अभिनंदन करत स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली आहे.



