जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावातील डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन येथे सलग पाच दिवस सुरू असलेला ‘तेजस्विता 2026’ हा वार्षिक सांस्कृतिक व कौशल्य विकास महोत्सव २५ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या उपक्रमांनी रंगलेल्या या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व स्पर्धात्मकता वाढविण्याचे कार्य केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिल पी. डोंगरे (डीन, फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, एनएमयू), भावना शर्मा (डिजिटल मीडिया इंटरप्रेनॉर), डॉ. केतकी पाटील (गोदावरी फाउंडेशन) तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नीलिमा वारके यांची उपस्थिती होती. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या गजरात करण्यात आले.
भावना शर्मा यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल मार्केटिंग आणि नवमाध्यमांच्या क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन केले. “करिअरची सुरुवात तुमच्या मोबाईलपासूनही होऊ शकते. शिक्षणासाठी पुणे-मुंबईलाच जावे लागते असे नाही; छोट्या शहरातूनही मोठी झेप घेता येते. शिक्षणाला वयाची अट नसते, सातत्याने शिकत राहणे गरजेचे आहे,” असे त्या म्हणाल्या. त्यांच्या प्रेरणादायी भाषणामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवउमेद निर्माण झाली.

डॉ. अनिल डोंगरे यांनी यशासाठी जिद्द आणि सातत्य आवश्यक असल्याचे सांगितले. “आजच्या काळात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीसारखी क्षेत्रे भविष्यात मोठी भूमिका बजावणार आहेत. टेक्नॉलॉजी इतकी प्रगत झाली आहे की ड्रायव्हरलेस कारही शक्य झाली आहे; त्यामुळे स्वतःला अपस्किल करणे ही काळाची गरज आहे,” असे ते म्हणाले.
डॉ. केतकी पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. “तुमच्यातील गुण ओळखा आणि त्यात प्राविण्य मिळवा. स्वतःला सतत अपडेट ठेवा, संस्कृती जपा आणि अडचणी संवादातून सोडवा,” असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.
‘तेजस्विता 2026’ अंतर्गत प्रोफेशनल डे (स्पोर्ट्स डे), मिस मॅच डे अँड किड्स डे, रांगोळी, चॉकलेट डे, मेहंदी, ट्रॅडिशनल डे, प्रेस कॉन्फरन्स, सोशल अॅक्टिव्हिटी, कल्चरल डे, डान्स, सिंगिंग आणि ड्रामा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यंदाचा ‘मिस तेजस्विता 2026’ हा किताब आदित्या अलकंडी यांनी पटकावला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. ऋतुजा नारखेडे यांनी केले.



