अँटिगा वृत्तसंस्था । भारतीय संघाची वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका आजपासून सुरू होत आहे. यापूर्वी झालेल्या तीन दिवसांच्या सराव सामन्यात भारताने वर्चस्व राखले. मालिकेत विराटबरोबरच भारतीय संघाची रचना कशी असेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
याबाबत माहिती अशी की, वेस्ट इंडिजविरुद्ध आजपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात लक्ष असणार आहे. सराव सामन्यात काही खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष होते. त्यानुसार चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा, उमेश यादव यांनी चमक दाखवून कसोटी मालिकेसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. ही लढत जिंकल्यास कर्णधार विराट म्हणून त्याला कसोटीचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या २७ विजयांशी बरोबरी करण्याची संधी असेल तर या सामन्यात त्याने शतकी खेळी केली तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या १९ शतकांशी त्याला बरोबरी करता येईल. विराटबरोबरच या सामन्यात भारतीय संघाची रचना कशी असेल, याचीही उत्सुकता असणार आहे. सर विव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर हा सामना होणार असूत येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पूरक मानली जाते. त्यामुळे कर्णधार विराट कोहली चार स्पेशालिस्ट फार्स्ट गोलंदाजांसह मैदानावर उतरणार आहे.
भारतीय संघासमोर आव्हान असेल तर वेस्ट इंडिजमधल्या खेळपट्टीचे. सध्या वेस्ट इंडिज संघात पुन्हा एकदा दर्जेदार वेगवान गोलंदाजांची परंपरा सुरू झाली आहे. भारतीय संघाला विंडीजच्या केमार रोच, शेनॉन गॅब्रिएल व कर्णधार जेसन होल्डर यांच्या वेगवान गोलंदाजीचा सामना समर्थपणे करायचा आहे. त्यातच येथील खेळपट्ट्याही आता फलंदाजांना आव्हान देऊ लागल्या आहेत. येथे झालेल्या मालिकेत इंग्लंडला १-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे भारतासमोर हे आव्हान अगदीच सामान्य असेल असे अजिबात नाही.