मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना आज महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राज्य शासनातर्फे महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रामधल्या अलौकिक कामगिरीसाठी प्रदान करण्यात येतो. त्याच धर्तीवर उद्योगक्षेत्रातील योगदानासाठी या वर्षीपासून ’उद्योगरत्न पुरस्कार’ देण्यात आला आहे. यात पहिल्या पुरस्कारासाठी रतन टाटा यांची निवड करण्यात आलेली आहे.
रतन टाटा यांच्या निवासस्थानी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांनी रतन टाटांना महाराष्ट्र शासनाचा ’उद्योगरत्न’ पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करून गौरव केला.
उद्योगरत्न पुरस्काराचे स्वरूप २५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे. ‘उद्योगमित्र’ पुरस्काराचे स्वरुप १५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र, ‘उद्योगिनी’ पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र तर ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये, सन्मान चिन्ह व मानपत्र असे आहे.