अमळनेर (प्रतिनिधी) भाजपाचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ व आमदार स्मिताताई वाघ यांची कन्या भैरवी आणि पुणे येथील सेनेच्या नेत्या जयश्रीताई पलांडे व अशोकराव पलांडे यांचे सुपुत्र अॅड.अपुर्व पलांडे यांच्या विवाह निमित्त दि ७ फेब्रुवारी रोजी अमळनेर येथे आयोजित केलेल्या स्वागत समारंभात गरीब तथा वंचित घटकाला भोजनाचा प्रथम मान
देत वाघ परिवाराने माणुसकीचे दर्शन घडविले.
शहरातील बन्सीलाल पॅलेस जवळ प्रताप मिल परिसरात सुमारे तीन एकर जागेत हा भव्य स्वागत समारंभ पार पडला.
सनई-चौघड्याचा निनादपारंपरिक वेशभूषेत सजलेली नवरा-नवरी, अन् कलवच्यांची धावपळ, मंगलाष्टकांचा मंजुळ स्वरएकमेकांच्या डोळ्यात नव्या आयुष्याच्या सुरुवातीची उमेद अन् जोडीदाराच्या स्वप्नांची मैफल रंगवत देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने ‘ते’ अडकले विवाहबंधनात! आगळ्यावेगळ्या अशा या विवाहसोहळ्याने या राजेशाही लग्नाचा अनुभव अमळनेरकरांना मिळाला. समारंभ स्थळी सुमारे ५०० मंडप टाकण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून मिठाई व खारा माल बनविण्याचे कार्य सुरू होते.विशेष म्हणजे टेबल खुर्ची लावून भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. एका वेळी सुमारे साडेतीन हजार लोक भोजनास बसतील अशी व्यवस्था याठिकाणी करण्यात आली होती. दि ७ रोजी सकाळी १० वा. स्नेह भोजनास सुरुवात झाली होती. पंगतीत पहिले बसण्याचा मान आश्रम शाळेचे गरीब विद्यार्थी तसेच दिव्यांग व मतिमंद विद्यार्थी,सफाई कामगार, रस्त्यावरील भिकारी आदी वंचित घटकांना देण्यात आला. त्यांना उदय वाघ व आमदार स्मिता वाघ यांनी जेवण वाढले त्यानंतर इत्तरांच्या पंगती सुरु होऊन सायंकाळी सुमारे ४ वाजेपर्यंत या पंगती सुरु होत्या. नियोजनासाठी कार्यकाऱ्यांसह सुमारे १५०० लोकांची टीम होती. दरम्यान, या शिस्तबद्ध झालेल्या स्वागत समारंभाची विशेष चर्चा तालुक्यात निर्माण झाली होती.
विक्रांत पाटलांच्या गळ्यात “शिट्टी” काय
आमदार स्मिताताई उदय वाघ यांच्या कन्येच्या स्वागत समारंभात भाजपा कार्यकर्त्यासंह पदाधिकारी आदी झाडून काम करत असतांना माजी आमदार साहेबराव दादा यांचे स्वीय सहाय्यक विक्रांत पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या गळ्यात “शिट्ट्या” आढळून आल्या ‘शिट्टी’ हे चिन्ह घेऊन या पूर्वीच अमळनेर नगरपरिषदेची निवडणूक शहर विकास आघाडी ने जिंकली होती. त्या वेळी “शिट्टी” चा चांगलाच बोलबाला झाला होता. त्यानंतर शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षा आणि नगरसेवकांवर अपात्रेची कारवाई झाल्यानंतर त्या सर्वांनी भाजपा मध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे पुन्हा त्यांच्याच गळ्यात अखेर शिट्टी दिसून आल्याने तत्कालीन शहर विकास आघाडीचे नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या मनामधील शिट्टी विषयीचा आदर कमी झालेला दिसतच नाही, असे स्वागत समारंभात कार्यकर्त्यांनी गळ्यात घातलेल्या शिट्टीवरून जनमानसात चर्चा होत होती. त्यामुळे आगामी काळात कोण कॊनाची शिटी वाजवतो, आणि कोण कोणाला शीळ घालतो, हे येणारा काळच सांगू शकेल!.