आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती उत्साहात साजरी, आधुनिक पत्रकारितेवर चर्चा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बाळशास्त्री जांभेकर यांनी भारतीय पत्रकारितेचा पाया रोवला, असे प्रतिपादन जळगाव जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले. ते जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनात आयोजित आद्य पत्रकार स्व. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष विजयबापू पाटील, प्रमुख वक्ते अमळनेरचे संदीप घोरपडे, जैन इरिगेशनचे मीडिया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष भिकाभाऊ चौधरी, कार्यवाहक अशोक भाटिया, विश्वस्त अनिल पाटील, मुकुंद एडके, पांडुरंग महाले आदी उपस्थित होते.

पत्रकारितेतील बदल आणि आव्हान :
युवराज पाटील यांनी ब्रिटिशकालीन पत्रकारिता, स्वातंत्र्योत्तर पत्रकारिता आणि आजच्या काळातील पत्रकारितेतील अंतर स्पष्ट केले. ते म्हणाले, “आज पत्रकारितेत स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे केवळ मुद्रित माध्यमावर विसंबून न राहता संपादकांनी बहुआयामी माध्यमे हाताळण्याचे कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज आहे.”

बाळशास्त्री जांभेकरांचे योगदान :
पाटील यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “बाळशास्त्रींनी संघर्षमय जीवनातही अनेक भाषा अवगत केल्या व त्या माध्यमातून त्यांनी अनेक शिक्षकही घडवले. दादाभाई नवरोजी हे त्यांचे शिष्य होते. ‘दर्पण’ बरोबरच सर्व शास्त्रांचा समावेश असलेले ‘दिग्दर्शन’ हे नियतकालिकही त्यांनी प्रभावीपणे चालवले. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी लेखणी झिजवली.”

आधुनिक माध्यमांचे महत्त्व :
आजच्या युगात फेसबुक, गुगल, इंस्टाग्राम आणि ट्विटर या माध्यमांतून कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती मिळू लागली आहे, असे पाटील म्हणाले. मात्र, मुद्रित माध्यमांचे महत्त्व आजही कायम आहे. देशात वर्तमानपत्रांचा खप आजही १० कोटीच्या जवळपास आहे, असे त्यांनी सांगितले. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशयपूर्ण मजकूर देण्यासाठी पत्रकारांनी ट्विटरची भाषा शिकणे गरजेचे असल्याचे आवाहन त्यांनी केले.

पत्रकारांच्या लेखणीला धार हवी :
प्रमुख वक्ते संदीप घोरपडे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “बाळशास्त्रींनी पत्रकारिता जोपासण्यासाठी आयुष्य वेचले. आजच्या दिशाहीन होत असलेल्या पत्रकारितेवर ताशेरे ओढले. बाळशास्त्रींना सर्व भाषा कळाल्या, पण पैशाची भाषा कळाली नाही. ज्यांना पैशांची भाषा कळते, त्यांची लेखणी भलतीकडेच वळते.” पत्रकारांच्या लेखणीला धार असेल, तर ते आमदार, मंत्र्यांनाही घरी बसवू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. समाजाला योग्य दिशा देण्यासाठी लेखणी झिजवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

सत्कार आणि नियुक्ती :
याप्रसंगी जिल्हा पत्रकार संघाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजयबापू पाटील यांचा ७१ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. तसेच, जिल्हा पत्रकार संघाच्या संघटकपदी सुरेश पाटील (यावल) आणि अमळनेर तालुकाध्यक्षपदी बापूराव आनंदराव पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी व्यंगचित्रकार शरद महाजन आणि आरोग्यदूत युवराज खोखरे यांनाही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप शिरुडे यांनी केले, तर सूत्रसंचालनही त्यांनीच केले. जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी विजयबापू पाटील यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेतला. भिकाभाऊ चौधरी यांनी आभार मानले.

Protected Content