चोपडा येथील राजवी पाटील वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रथम

rajavi patil

चोपडा प्रतिनिधी । यवतमाळ येथे नुकताच झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराची विद्यार्थींनी राजवी पाटील हिने नाशिक विभागातून प्रथम क्रमांक मिळवून राष्ट्रीय पातळी गाठली. तिने 87 किलो गटात हे यश मिळवले आहे.

यानिमित्ताने येथील चो.ए. सोसायटी व पं. समितीद्वारे राजवीचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मोरेश्वर देसाई, सचिव माधुरी मयुर, सदस्य चंद्रहासभाई गुजराथी तसेच चोपडा पंचायत समिती शिक्षण विभाग येथील गट शिक्षण अधिकारी डॉ. भावना भोसले तसेच केंद्रप्रमुख नरेंद्र सोनवणे, दीपक पाटील, युवराज पाटील आणि अहिरे आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. तालुक्यात व संस्थेच्या 102 वर्षाच्या इतिहासात राष्ट्रीय पातळी गाठणारी ती पहिली विद्यार्थिंनी ठरली. तिचा सुवर्ण पदक, प्रमाणपत्र व ट्रॅक सूट देऊन गौरव करण्यात आला. 17 वय वर्ष गटातील 100 मीटर धावणे यात हर्षाली पाटील ही विभाग स्तरावर तृतीय आली. तसेच डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत दुसऱ्या फेरीसाठी नाशिक विभागात निवड झालेले वेदांत नेवे व जयदीप बावा या बाल वैज्ञानिकांचा देखील सत्कार करण्यात आला. बौद्धिक क्षेत्रात मुलींची प्रगती आहेच, परंतू पुरूषी क्षेत्रात देखील विद्यार्थिंनी या अचूक यश मिळवून ध्येयप्रती जात आहे. असे उद्गार सचिव माधुरी मयूर यांनी काढले. त्यांनी क्रिडा शिक्षक, विज्ञान शिक्षक व विद्यार्थी यांची कौतुक केले. यातूनच द्रोणाचार्य, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारे शिक्षक व विद्यार्थी घडवावेत ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि संयमाने ध्येयाप्रती अग्रेसर होता येते. प्रत्येकाने वास्तव स्विकारून यशाच्या मार्गावर सतत पुढे रहावे, तसेच संस्था आणि शाळेच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत ठेवावा असे प्रतिपादन डॉ.भावना भोसले (ग.शि.अ.) यांनी केले. त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक एस.एस.पाटील, पी.व्ही.जोशी, नरेंद्र महाजन आदींचा देखील गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक डी.व्ही. याज्ञिक यांनी केले. या कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक डी. के. महाजन, पर्यवेक्षक जी.वाय. वाणी, आर.आर. शिंदे, वाय.एच. चौधरी, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य जे.एस.शेलार तसेच गोविंद भाई गुजराथी, उल्‍हास गुजराथी, डी.टी.महाजन शिक्षक बंधू भगिनी, लेखनिक कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही.ए. गोसावी यांनी केले.

Protected Content