चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपरखेड तांडा येथे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात आज (दि.१८) प्रवेशोत्सव आनंदात साजरा करण्यात आला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चिटणीस राजेश वाडीलाल राठोड, शिक्षक पालक संघाचे माजी अध्यक्ष रघुनाथ जगताप, समाजकल्याण विभागाचे तालुका समन्वयक अनिल पगारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रथम उपस्थित विदयार्थ्यांना अध्यक्षांच्या हस्ते पाठयपुस्तकांचे वाटप करून त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तद्नंतर प्राथमिक विभागाच्या जेष्ठ शिक्षिका सौ. मीना बागुल यांनी शाळेला टी. व्ही. सप्रेम भेट म्हणून दिला. त्याचा उपयोग विदयार्थ्यांना शिकवण्यासाठी होणार आहे. त्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. इयत्ता १० वी १२ वी च्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाच्या वतीने देण्यात येणारा छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्काराचेही या प्रसंगी वितरण करण्यात आले.
तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी चौघा विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु.५००० चा धनादेश दिया. अध्यक्षीय मनोगतात राजेश राठोड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य आर. बी. उगले यांनी तर मुख्याध्यापक एम. डी. बागुल यानी याप्रसंगी मार्गदर्शन केले सूत्रसंचलन बी.पी. पाटील व श्रीमती के. ए. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. के. व्ही. चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चारही विभागातील प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.