चाळीसगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या काल (दि.१७) झालेल्या सर्वसाधारण सभेत येथील पंचायत समिती सभापती सौ. स्मितल दिनेश बोरसे यांनी शासनाची वृक्ष लागवड मोहिम यशस्वी होण्यासाठी ‘बिहार पॅटर्न’ लागू करण्याचा मुद्दा मांडला. त्यांच्या या सूचनेचे सगळ्यांनी स्वागत केले आहे.
शासनातर्फे लागवड करण्यात येणाऱ्या वृक्षांचे संगोपन अपेक्षित त्या प्रमाणांत होत नसल्याने झालेली लागवड यशस्वी होत नाही. म्हणून त्यांनीनी संपुर्ण सभागृहाला आवाहन केले की, प्रत्येक पंचायत समिती मार्फत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधुन ‘बिहार पॅटर्न’ संकल्पनायशस्वीपणे राबविता येणे शक्य आहे. यामध्ये ५०० वृक्षांसाठी ६.०० लक्ष रुपये व १००० वृक्षांसाठी १२.०० लक्ष रुपयांचे अंदाजपत्रक तयार होते, व संगोपनासाठी लागणारे मनुष्यबळ, पाणी, खते व ट्री गार्ड घेऊन वृक्ष लागवड मोहिम यशस्वी करणे सहज शक्य होते. जिल्हयातील हजारो ग्रामपंचायतींनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी या सुचनेला अत्यंत महत्वपुर्ण म्हटले. तसेच जिल्हा परिषदचे जेष्ठ सदस्य प्रभाकर सोनवणे यांनी सभापतींचे मनापासुन कौतुक केले. यापुर्वीही सौ. स्मितल बोरसे यांनी जि.प. शाळेमधील विद्युत पुरवठ्याविषयी मत मांडले होते. संपुर्ण जिल्हयातील शाळांचे विज बिल ग्रा.पं.च्या १४ वा वित्त आयोगामार्फत भरण्यात आले होते, त्यामुळे सर्व शाळांमध्ये आता विद्युत पुरवठा सुरळीत असल्याचे दिसून येते.