भुसावळ (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या दीपनगर येथे आज सकाळी गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अवघ्या तीन दिवसापूर्वी भुसावळात गोळीबारात पाच जणांची हत्या झाल्यानंतर आज पुन्हा एकदा गोळीबार झाल्याच्या वृत्ताने भुसावळ परिसर हादरला आहे. दरम्यान, पोलीस अधिकारी मात्र, गोळीबार झाल्याचा इन्कार करत आहेत.
आज सकाळी १० वाजेच्या सुमारास दीपनगर येथील इमारत क्र E-29-1981 येथे राख ट्रास्पोर्टचे ठेकेदार मुकेश शलेंद्र तिवारी( वय 45) यांच्यावर वैयक्तिक वादातून दीपक मधुकर हातोळे (वय 41) याने आपल्या जवळ असलेल्या गावठी पिस्तुलीने तिवारी यांच्यावर धाक दाखवून दहशत निर्माण करत होता. यावेळी मात्र, दोघांच्या झटापटीत पिस्तुल खाली पडले. त्यानंतर दीपक हा तिथून फरार झाला. व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार होणार होता, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. परंतू घटनास्थळी पिस्तुलसह गोळीची कॅप देखील आढळून आले आहे. त्यामुळे पिस्तुल न चालवता गोळी बाहेर कशी आली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह पोलिसांनी धाव घेत माहिती जाणून घेतली. श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आल्याचेही कळते.