जळगाव प्रतिनिधी । येथील संस्कार परिवारातर्फे मुलांमध्ये धार्मिक संस्काराची निर्मिती व्हावी, यासाठी गीता पठण आणि त्याचे सार सदस्यांकडून सांगितले जात आहेत. तसेच आगामी दिवाळीनिमित्त हानिकारक ठरणारे फटाके फोडू नये, यासाठी फटाकेमुक्त दिवाळी अभियान राबविण्यात येत आहे.
याला पाठींबा म्हणून संस्कार परिवारातर्फे मुलांमध्ये जनजागृती केली जात आहे. तसेच मुलांना भगवदगीता पुस्तिका मोफत देण्यात येत आहे. मुलांमध्ये धार्मिक संस्कार व्हावेत, याकरिता संस्कार परिवारच्या सदस्या चार ठिकाणी गीतापठण कार्यक्रम घेत आहेत.
मुलांना गीतांचे श्लोक सांगणे, ते पाठ करून घेणे, त्यांचे अर्थ सांगून त्यांना जीवन जगण्याचा सार सांगणे, अशा प्रकारे ज्ञान संस्कार परिवाराचे सदस्य देत आहेत. रोटरी हॉल, संत ज्ञानेश्वर मंदिर, आनंद नगर मधील हॉल येथे हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचबरोबर फिरत्या पद्धतीने देखील सदस्या मुलांच्या घरी जावून मुलांना गोळा करून गीता पठण उपक्रम घेत आहेत. आजवर एकूण ८० मुले याचा लाभ घेत असून सदस्यांचे कौतुक करण्यात येत आहे.